नवीन वागदरा येथे कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

तिघांना अटक, जीवंत कोंबड्यासह साडे तीन हजाराचा मुद्देमाल जप्त

 

जितेंद्र कोठारी, वणी : पोलीस स्टेशन अंतर्गत वागदरा (नवीन) येथे कोंबड्याच्या हारजीतवर पैशाची बाजी लावून जुगार खेळताना तिघांना वणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी धाड टाकताच काही जण दुचाकीवर पळून जाण्यात यशस्वी झाले. गणेश धोटे (30) रा. पिंपळगाव ता. राळेगाव, सलीम जमील शेख (36) रा. भाग्यशाली नगर वणी, संजय पंडीले (50), रा. वाघदरा असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.

पो. नि. अजित जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहर पोलीस डिबी पथकाने खाजगी वाहनाने जाऊन शुक्रवार 29 सप्टे. रोजी सायंकाळी 5 वाजता नवीन वागदरा येथील रामघाट काली माता मंदिराजवळ रेड केली. त्याठिकाणी काही इसम कोंबड्याच्या पायाला धारदार काती बांधून त्याची झुंज लावून हारजीतचा खेळ खेळताना दिसून पडले. पोलिसांची धाड पडताच काही जुगारी संधी साधून दुचाकीवर पळून जाण्यात यशस्वी झाले. तर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ताब्यातील आरोपीची झडती घेतली असता त्यांच्याकडून 2 हजार 870 रु. रोख, एक जिवंत कोंबडा पक्षी किंमत 300 रु. व धारदार काती नग 2 असे एकूण 3 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पो.कॉ. वसीम अहमद यांच्या फिर्यादवरुन आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (b), 12(c) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या आदेशाने डिबी पथक कर्मचारी विकास धडसे, शुभम सोनुले, सागर सिडाम, भानुदास हेपट यांनी केली.

Comments are closed.