मुळची वणीची श्वेता जेनेकर बनली केंब्रिज विद्यापीठाची पदवीधर

एमबीए फायनान्स पूर्ण; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

बहुगुणी डेस्क, वणी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जागतिक स्तरावर यश संपादन करण्याची क्षमता असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुळची वणीशी नाळ जोडलेली असलेल्या श्वेता किशोर जेनेकर हिने इंग्लंडमधील जागतिक कीर्तीच्या केंब्रिज विद्यापीठाअंतर्गत असलेल्या किंग्स कॉलेजमधून एमबीए फायनान्स पदवी यशस्वीरित्या पूर्ण करून उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे वणीसह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Birthday

श्वेता ही मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पिंपरी (नारडा) येथील असून सध्या तिचे कुटुंब तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे वास्तव्यास आहे. तिचे वडील किशोर उद्धव जेनेकर हे मायनिंग अभियंता आहेत. वणी शहरात जन्म झालेल्या आणि झरी तालुक्यातील बोपापूर येथे आजोळ असलेल्या श्वेताने जागतिक दर्जाच्या विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

इ.स. 1441 मध्ये राजा हेन्री सहावे यांनी स्थापन केलेले किंग्स कॉलेज हे जगातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते. जवळपास 584 वर्षांची वैचारिक आणि शैक्षणिक परंपरा लाभलेल्या या संस्थेतून अनेक जागतिक नेते, संशोधक आणि विचारवंत घडले आहेत. स्वतंत्र विचारसरणी, संशोधन आणि नेतृत्व विकासासाठी प्रसिद्ध असलेल्या या संस्थेतून शिक्षण पूर्ण करणे हा श्वेतासाठी अत्यंत अभिमानाचा आणि अविस्मरणीय अनुभव ठरला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विशेष म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या दिग्गज व्यक्तींनीही केंब्रिज विद्यापीठाशी शैक्षणिक नाते जोडले होते. अशा जागतिक दर्जाच्या विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून श्वेताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. अलीकडेच पार पडलेल्या भव्य पदवीदान समारंभात श्वेताला एमबीए फायनान्स पदवी प्रदान करण्यात आली. 

श्वेताने प्राथमिक शिक्षण आदिलाबाद येथे पूर्ण केले. त्यानंतर हैदराबाद येथील डीआरएस इंटरनॅशनल स्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे नागपूर येथील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी.ई. आर्किटेक्चर पदवी संपादन केली. शिक्षणातील सातत्य, मेहनत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीमुळेच तिने हे यश मिळवले.

“आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाला जाते,” अशी भावना श्वेताने व्यक्त केली. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनाही जागतिक स्तरावर शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.