नियमित वाचनाने व्यक्तीची स्वतंत्र ओळख निर्माण होते – ठाणेदार गोपाळ उंबरकर
वणी नगर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनीचे उद्घाटन
पुरुषोत्तम नवघरे वणी : “नियमित वाचनाने मन आणि मस्तिष्क सुदृढ होते. त्यामुळे काय चांगले, काय वाईट याचा निर्णय घेण्याची क्षमता वाढते. वाचनामुळे विचारांची खोली आणि व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र ओळख निर्माण होते,” असे मत ठाणेदार गोपाळ उंबरकर यांनी व्यक्त केले. ते नगर वाचनालयात आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघचालक हरिहर भागवत हे होते.
दरवर्षी नगर वाचनालयामार्फत महाराष्ट्रातील दर्जेदार, साहित्यिक, विनोदी तसेच स्त्रीशक्ती विषयक दिवाळी अंकांची खरेदी केली जाते. हे अंक वणीकरांना उपलब्ध करून देण्यापूर्वी त्यांच्या अवलोकनासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. उद्घाटनानंतर अतिथींनी प्रदर्शनातील विविध अंकांचे अवलोकन करून समाधान व्यक्त केले.

दोन दिवसांचे हे प्रदर्शन संपल्यानंतर 26 ऑक्टोबरपासून वाचकांना 300 रुपयांच्या न परतावा नोंदणी शुल्कावर एकूण 35 दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध होणार आहेत. अध्यक्षीय भाषणात हरिहर भागवत यांनी नगर वाचनालय वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी करीत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विशाल झाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे आणि राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.



Comments are closed.