बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी सकाळी वणीतील गजानन नगरी जवळील वडगाव टीप रोडवर एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. ऐन सणासुदीच्या काळात मृतदेह आढळल्याने व एक आठवड्याआधीच भालर रोडवरच्या मर्डरची घटना ताजी असतानाच ही घटना उघडकीस आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. मात्र या हत्याकांडाचा वणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार, मृतक स्वप्नील किशोर राऊत (26) हा विवाहित होता व तो वणीतील रंगनाथ नगर येथील रहिवासी होता. तो मजुरी करायचा. गुरुवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास त्याला एका अज्ञात इसमाचा कॉल आला. ठेकेदाराकडून पैसे आणायचे असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला. सायंकाळी 6 वाजता पत्नीने फोन केला असता, त्याने लवकरच घरी येतो असा निरोप पत्नीला दिला. मात्र, रात्री 8 वाजेपासून त्याचा फोन बंद होता. रात्री तो घरी परतला नाही.
वडगाव टीप रोडवर आढळला मृतहेह
सकाळी स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेणे सुरु केले. दरम्यान गजानन नगरी, वडगाव टीप रोड, वणी येथे एक मृतदेह आढळल्याची बातमी सोशल मीडियावरून पसरली. सदर फोटो हा स्वप्नीलचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मृतकाचा मोठा भाऊ चेतन किशोर राऊत हा घटनास्थळी गेला. तर त्याला स्वप्नीलचा मृतदेह गळा व डोक्याला गंभीर मार लागलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्र व दगडाने मारहाण करून स्वप्नीलची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपासाची मदत घेण्यात आली. खबरी ऍक्टिव्ह करण्यात आले. अखेर पोलिसांच्या पथकाला काही क्ल्यू मिळाले.
सीसीटीव्हीने उलगडले खुनाचे गुढ
मोबाईल लोकेशनची हालचाल टिपली असता मृतकाची शेवटची हालचाल ही ब्राह्मणी रोडवर दिसून आली. दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास स्वप्नील एका लाल रंगाच्या पॅशन प्रो दुचाकीवर दोन व्यक्तींसोबत ब्राम्हणी फाटा चौकातून टोलनाक्याकडे जाताना दिसला. या दुचाकीच्या मालकाची माहिती मिळवून, त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला. दुचाकीच्या नंबरवरून संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. आणि या खुनाचे गुढ उकलले.
पोलिसांनी सोबत असलेल्या दोन्ही तरुणांनी आधी तर आमचा काही संबंध नसल्याचे सांगत हात वर केले. मात्र पोलिसी खाक्या मिळताच ते पोपटासारखे बोलायला लागले. आरोपींनी मृतकाला दीपक चौपाटी जवळ बोलावले. त्यानंतर त्यांनी वाईन शॉपीतून दारू खरेदी केली. त्यानंतर ते मृतकाला ब्राह्मणी रोडवरून संविधान चौक मार्गे गजानन नगरी जवळ घेऊन गेले. तिथे त्यांनी मृतकाला दारू पाजली व त्यानंतर दगडाने ठेचून व जवळच असलेली एक दारूची बॉटल फोडून त्याने गळा चिरला. त्यांनी अनैतिक संबंधातून हा खून केल्याचे सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी सुमेश रमेश टेकाम (वय 24, रा. वडजापूर, ता. वणी, जि. यवतमाळ) व सौरभ मारोती आत्रम (वय 27, रा. वडजापूर, ता. वणी, जि. यवतमाळ) या दोघांना अटक केली.

वणी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने तपास करून या गंभीर गुन्ह्याची उकल केली आहे. सदर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या आदेशाने करण्यात आली. पोलीस पथकात पोउपनि सुदाम आसोरे, पोलीस अंमलदार श्याम, नंदकुमार, मानेश्वर, गजानन, गणेश यांचा समावेश होता. तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे मोलाचे सहकार्य लाभले. पुढील तपास पो उपनि सुदाम आसोरे करीत आहेत. अवघ्या काही तासात खुनाचे गुढ उलगडल्याने वणी पोलिसांचे शहरभर कौतुक होत आहे.



Comments are closed.