वणी पोलिसांकडून अनेक तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

दुचाकी व मोबाईल चोरी, ऑनलाईन फ्रॉडसह काही गंभीर तक्रारीही 'बर्क'

जितेंद्र कोठारी, वणी: पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेउन आलेली प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारीची नोंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे. असे असताना मात्र वणी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तक्रारी ‘बर्क’ करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. यात चोरीच्या तसेच ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणाचा समावेश जास्त आहे. पोलीस ठाण्याचा क्राईम रेट कमी झाल्याचे दाखवण्यासाठी अनेक पोलीस ठाणे ही क्ल्रुप्ती वापरत असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

शहरात दुचाकी व मोबाईल चोरीची अनेक घटना घडत आहे. दर दिवशी एक दोन दुचाकी शहरातील विविध भागातून लंपास होत आहे. मात्र दुचाकी चोरी गेल्याची तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तीची तक्रार घेण्यास सरळ नकार दिला जात असल्याचा आरोप होत आहे. तक्रारीची साधी नोंद न करता 4-5 दिवस वाट बघा, आम्ही शोध घेतो. मिळाली तर तुम्हाला फोन करतो. असा आश्वासन देऊन तक्रारदाराला देऊन परत पाठविले जाते.

मोबाईल जातो, चोरीला पण तक्रार हरवल्याची
सध्या भुरट्या चोरांनी आपला मोर्चा मोबाईल चोरीकडे वळवला आहे. मोबाईल सहज चोरता येऊ शकतो. शिवाय काळ्या बाजारात त्यांची किंमतही चांगली येते. त्यामुळे मोबाईल चोरीच्या घटना परिसरात मोठ्या प्रमाणात घडतात. याबाबत चोरीची तक्रार करण्यास पीडित गेला असता त्यांना हरवल्याची तक्रार नोंदवल्याचे सांगितले जात असल्याचा आरोप अनेक पीडित करीत आहे.

मागील काही काळापासून ऑनलाईन फसवणूक व ओटीपी विचारून बँक खात्यातून लाखो रुपये लंपास करण्याचे प्रकारही शहरात वाढले आहे. ऑनलाईन फ्रॉडच्या तक्रारीबाबतही पोलिसांकडून तक्रार नोंदण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही केला जात आहे. नुकताच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सासऱ्याच्या बँक खात्यातून 2 लाख 3 हजार रुपये उडविण्यात आले होते. त्याची तक्रारही 2 दिवस दाखल करण्यात आली नाही. शेवटी दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या जावयाला बोलावून एफआयआर दाखल करण्यात आली.

गुन्हा कोणत्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला, तरी तक्रारदाराला त्या हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्या असे पोलिसांना सांगता येत नाही. मात्र वणी पोलिसांच्या अडेलतट्टू धोरणामुळे पुणेवरून वणी आलेल्या विद्यार्थ्याला परत पुणे जाऊन तक्रार द्यावी लागली. वणी येथीलच एका व्यक्तीने तब्बल 37 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार 10 दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनमध्ये दिल्याची माहिती आहे. परंतु गुन्हा दाखल करणे तर दूरच त्या तक्रारीची साधी दखलही घेण्यात आली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.