बहुगुणी डेस्क, वणी: रेल्वे बांधकामाच्या साईटवर सुरू झालेल्या किरकोळ वादाने सायंकाळी हिंसक रूप धारण केले. रेल्वे साइटिंगचे काम करणाऱ्या कंपनी मालकाला व त्यांच्या तीन मित्रांना घुग्घुस येथील चार इसमांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी चौघांनी कारची तोडफोड करत दहशत माजवली. या घटनेने साखरा परिसरात खळबळ उडाली असून शिरपूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी पवन नरेश्वर मोहरकर (वय 34, रा. फ्रेंड्स कॉलनी, नागपूर, ह.मु. साखरा) व त्यांच्या भावाची धोपटे ट्रेडर्स नावाने कंपनी आहे. या कंपनीकडे मुंगोली गावाजवळ रेल्वे साइटिंगचे कंत्राटी काम आहे. एक महिन्यांपासून मुंगोली जवळ या कंपनीचे काम सुरु आहे. त्यामुळे पवन हे दिवसभर साईटवर राहतात. 28 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 2.15 वाजता काम सुरू असताना घुग्घुस येथील चार इसम रेल्वेचे काम सुरु असलेल्या साइटवर आले. दरम्यान त्यांची हालचाल संशयास्पद असल्याने पवन यांनी त्यांना इथे चोरी करू नका, असे हटकले.
त्यावर त्यांनी पवन यांना शिवीगाळ केली व धमकी देऊन ते निघून गेले. पवन यांनी याकडे दुर्लक्ष केले. पवन हे साईटच्या कामामुळे साखरा येथे रूम करून राहतात. संध्याकाळी साईटचे काम संपल्यानंतर ते रुमवर गेले. सुमारे 7.15 वाजता पवन हे त्यांचे मित्र राहुल पगारे, सुमीत वासनिक आणि आकाश नागपुरे यांच्यासह रूमसमोर कारमध्ये बसले होते. तेव्हा तेच 4 इसम मोठ्या आवाजात शिवीगाळ करीत कारजवळ आले. त्या चौघांनी पवनला गाडीबाहेर बोलावले. गाडीतून बाहेर येण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी गाडीची काच आणि हेडलाइट असेंब्ली फोडली.
त्यामुळे गाडीत बसलेले चौघेही खाली उतरले. यावेळी आरोपी राजन्ना, सद्दाम, दानिश आणि शाहरुख कुरेशी (सर्व रा. घुग्गूस, जि. चंद्रपूर) यांनी फिर्यादी पवन मोहरकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची आणि गाडी जाळण्याची धमकी दिली.
फिर्यादी पवन मोहरकर यांनी त्याचा भाऊ प्रणय धोपटे यांच्यासह शिरपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या जबानीवरून चारही आरोपींविरुद्ध बीएनएसच्या कलम 115(1), 3(5), 324(4), 351(2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे. (इमेज एआय जनरेटेड)



Comments are closed.