विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात आता स्वागत द्वार उभारणे नित्याचेच होऊन बसले आहे. कोणत्याही धर्माचा उत्सव असो किंवा एखादा कार्यक्रम त्यासाठी रस्त्यामध्ये स्वागतद्वार उभारले जाते. स्वागरद्वार उभारताना रस्त्याला फोडून त्या ठिकाणी लाकडी फाटे गाडल्या जाते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशाप्रकारचे खड्डे खोदलेले दिसून येते. नियम सांगतो की, सदर रस्त्यावर खड्डे खोदल्यावर ते व्यवस्थित दुरुस्त करावे. परंतु कुणीही याबाबत जागृत दिसून येत नाही व खोदलेले खड्डे तसेच ठेवल्या जाते. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
हे स्वागतद्वार उभारल्याने वाहतुकीसही निहाकच त्रास सहन करावा लागतो. अनेकदा या स्वागतद्वाराचे फाटे रस्त्यावर येतात व रस्ता संकुचित होऊन अपघाताची शक्यता निर्माण होते. स्वागतद्वार उभारताना त्याच्या मागे राजकीय व सामाजिक कार्यकर्ते असतात त्यामुळे या प्रश्नाला कुणीही उचलत नाही. याबाबत कोणत्याही राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटनेचा रोष ओढवुन घेण्याची कुणाचीही तयारी नसते. याचाच फायदा सर्व संघटना घेताना दिसून येतात.
मंडप डेकोरेशनवाले ही याचाच फायदा घेतात. या सर्व प्रकारात राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत आहे याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. यासंधी कुणी सामाजिक कार्यकर्ता का समोर येत नाही?असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे.
रस्ता सुधारण्याची मागणी तर अनेक वेळा केल्या जाते. परंतु चांगला गुळगुळीत रस्ता फोडल्यानंतर तो दुरुस्त का करण्यात येत नाही अशी मागणी कुणीही करताना दिसून येत नाही. हा गंभीर प्रश्न आता कुणी उपस्थित करणार काय याकडे सर्व वणीकर जनतेचे लक्ष लागले आहे.