अल्पवयीन मुलीवर विवाहित तरुणाचा अत्याचार; लादले मातृत्व

दवाखान्यात गेल्यावर घटना उघडकीस, आरोपी फरार...

बहुगुणी डेस्क, वणी: एका गावात अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत विवाहित पुरुषाने तिच्यावर मातृत्व लादल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मारेगाव तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी नोव्हेंबर 2024 मध्ये सकाळ पाळीतील शाळा करून दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घरी एकटीच टीव्ही पाहत होती. याचवेळी कौटुंबिक संबंध असलेला आरोपी किशोर विक्रम आत्राम (30) घरात शिरला आणि तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कुणालाही सांगू नको, अशी धमकी देत आरोपीने पीडितेला गप्प बसवले. भीतीने मुलीने ही गोष्ट आईसह कुणालाही सांगितली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यानंतर पुन्हा ऑक्टोबर 2025 मध्ये मुलगी घरी एकटी असताना आरोपी घरात शिरला आणि बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. यावेळी पीडितेने आरोपीला इशारा दिला की, “तू पुन्हा माझ्या घरी आलास तर मी ही गोष्ट सर्वांना सांगेन.” मात्र आईला ही बाब कळल्यास आई जिवाचे बरेवाईट करेल, या भीतीने ती गप्प राहिली.

गेल्या 3 महिन्यांपासून पीडितेला मासिक पाळी आली नव्हती. पोटात त्रास सुरू झाल्याने आईला शंका आली. वणी येथील एका खासगी डॉक्टरकडे तपासणी केली असता मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. यानंतर आईने तातडीने मारेगाव पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 65 (1), 64 (2), 64 (2) एम आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार श्याम वानखेडे करीत असून आरोपी फरार आहे. ही घटना समोर आल्यानंतर गावात संतापाचे वातावरण असून अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेतलेला हा घृणास्पद प्रकार समाजमनाला हादरवणारा ठरला आहे. (ईमेज एआय जनरेटेड)

Comments are closed.