पंक्चर काढण्यावरून वाद… एकाचा पाडला दात एकाचे फोडले डोके

ग्राहकावरून दोन दुकानदारांमध्ये रक्तरंजित संघर्ष, चौघांविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: यवतमाळ रोडवरील रामदेव बाबा मंदिरासमोरील टायर पंचर दुकानात सकाळच्या वेळी ट्रकचा पंक्चर बनवण्यावरून चांगलाच वाद झाला. हा किरकोळ वाद रक्तरंजित मारहाणीत बदलला. लोखंडी टॉमीने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून यात एका व्यक्तीचा दात पडला व एकाचे डोके फुटले आहे. शुक्रवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणा-या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारीनुसार, मेघदूत कॉलनीतील रहिवासी असलेले मोहम्मद जैनुद्दीन मोहम्मद जमालुद्दीन (वय 42) यांचे लालपुलिया परिसरातील सीसीआय पेट्रोलपंपजवळ पंक्चर काढण्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या शेजारी मोहम्मद रमजानी (वय 50) यांचे पंक्चर काढण्याचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे 08:00 वाजता मोहम्मद जैनुद्दीन त्यांच्या दुकानात एक ट्रकचालक पंचर काढण्यासाठी आला होता. चालकाने पंक्चरचे काम सुरू करण्यास सांगितल्यावर शेजारील दुकानधारक मोहम्मद रमजानी (वय 50) तिथे आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रमजानी यांनी हा माझा ग्राहक असल्याने मी पंक्चर काढणार असे सांगितले. पंक्चर काढण्यावर दोन दुकानदारात वाद सुरु झाला. वाद चिघळताच रमजानी यांच्यासोबत त्यांची मुलं मोहम्मद सलाम (30), मोहम्मद शकिल (22) आणि मोहम्मद राजा (28) घटनास्थळी आली. शिवीगाळ करत तिघांनी जैनुद्दीन यांना मारहाण केली. दरम्यान,  रमजानी यांच्या मुलाने त्याच्या हातातील लोखंडी टॉमीने वार करीत जैनुद्दीन यांना जखमी केले.  मारहाणीत त्यांचा एक दात पडला.

वाद सुरु असलेले पाहून शेजारील दुकानदार राजेंद्र प्रसाद मध्यस्थी करण्यासाठी धावले असता, त्यांच्यावरही रमजानी यांच्या मुलांनी टॉमीने डोक्यावर प्रहार केला. या मारहाणीत त्यांचे डोके फुटले.  दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मो. जैनुद्दीन यांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(2), 3(5), 351(2), 351(3) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.