चिखलगाव ग्रामपंचायतीच्या 8 सदस्यांचा सामूहिक राजीनामा
पारदर्शक कारभार नसल्याचा, विकासकामं ठप्प असल्याचा सरपंच व उपसरपंचावर आरोप
विवेक तोटेवार, वणी: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चिखलगाव ग्रामपंचायतीत मोठा राजकीय उलथापालथीचा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायतीतील तब्बल 8 सदस्यांनी एकाचवेळी गटविकास अधिकाऱ्यांकडे आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे सादर करून खळबळ उडवली आहे. राजीनामा देणाऱ्या सदस्यांनी ग्रामपंचायतीत हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप केला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये संतोष राजुरकर, अतुल चांदेकर, पंकज मोरे, हरिश्चंद्र कारेकर, सुधीर ठेंगणे, अर्चना वानखेडे, सुचिता भगत आणि माया माते यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. तसेच सदस्यांशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच रुपाली कातकडे यांनी वणी बहुगुणीकडे दिली आहे.
राजीनामा सदस्यांचा राजीनामा दिलेल्या सदस्यांचा आरोप आहे की बैठकींच्या प्रोसिडिंग लेखी स्वरूपात न करता कोऱ्या कागदावर सह्या करण्याचा दबाव टाकला जातो. गावातील बांधकामांबाबत दिलेल्या सूचनांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते, तर अनेक कामे नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीतून देयके अदा करताना त्यांना विश्वासात घेतले जात नाही. विविध ले-आऊटच्या विकासकामांबाबत विचारणा केल्यास जबाबदारी टाळली जाते, तर सरपंच व उपसरपंच स्वतःच्या ले-आऊटमधील कामे परस्पर ठराव करून मंजूर करून घेतात.
या सर्व प्रकारामुळे गावातील विकासकामे ठप्प झाली असून ग्रामस्थांच्या समस्या सोडवणे कठीण झाले आहे. पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने काम करणे अशक्य झाल्यानेच राजीनाम्याचा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे सदस्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, सरपंच सौ. रुपाली कातकडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अजूनपर्यंत राजीनामा देणाऱ्या सदस्यांनी माझ्याशी या विषयावर चर्चा केलेली नाही. त्यांनी राजीनाम्याची माहिती दिलेली नाही. मी सध्या बाहेरगावी असल्याने याबाबत फारशी माहिती नाही. मात्र गावात आल्यानंतर सर्व सदस्यांशी चर्चा करणार आहे.”
चिखलगाव ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच व सदस्य अशी 18 सदस्यांची बॉडी असून त्यातील 8 सदस्यांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे केवळ गावातच नाही तर परिसरातही खळबळ उडाली आहे.



Comments are closed.