‘होता युती – आघाडी, नेत्या – कार्यकर्त्यांची थंड झाली नाडी’

युतीचे संजीवरेड्डी बोदकुरवार तर आघाडीचे वामन कासावार यांना तिकीट

0

वि. मा. ताजने, वणी – महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी युती – आघाडीची घोषणा होताच वणी विधानसभा मतदार संघ नेमका कुणाच्या वाट्याला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस युतीमध्ये वणी मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेला. विध्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पुन्हा भाजपची उमेदवारी मिळाली. त्यामुळे  शिवसेनेचे विश्वास नांदेकर, संजय निखाडे, सुनिल कातकडे यांच्यासह कट्टर शिवसैनिकांचा चांगलाच हिरमोड झाला. तर आघाडीत वणी मतदार संघ पुन्हा काँग्रेसला मिळाला. माजी आमदार वामन कासावार यांच्यावर वरिष्ठांनी विश्वास टाकत उमेदवारी बहाल केली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. महेंद्र लोढा आणि त्यांना मानणारा वर्ग प्रचंड नाराज झाला. यामुळे ‘कुठे हसू तर कुठे आसू’अशी परिस्थिती निर्माण झाली.

वणी मतदार संघात शिवसेनेची पक्कड चांगलीच घट्ट होती. म्हणून माजी आमदार नांदेकर यांनी वणी मतदार संघ शिवसेनेला मिळावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. डॉ. लोढा यांनीही राजकारण कमी आणि समाजकारण जास्त प्रमाणात करीत लोकांची मने जिंकली होती. मात्र उमेदवारी मिळविण्यात यश आले नाही. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशा- आकांशावर चांगलेच विरजण पडले. भविष्यात पुन्हा वणी मतदार संघ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी पडण्याची आशा सध्या तरी धूसर झाली आहे. त्यामुळे दोन्ही राजकीय पक्षांच्या कट्टर समर्थकांत संतापाची लाट उसळली आहे. कार्येकर्ते द्विधा मनःस्थितीत आहे. स्थानिक नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. मुळात काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या मतदार संघात शिवसेनेने माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली दबदबा निर्माण केला होता.

पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र गत विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपच्या बोदकुवार यांना आमदारकीची लॉटरी लागली. परत एकदा हो – नाही करता करता बोदकुरवार यांना तिकीट मिळाले. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी संजय देरकर यांनी जिकरीचे प्रयत्न केले. मात्र पदरी निराशाच आली. अखेरीस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या – कार्यकर्त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. वरिष्ठ पातळीवरील राजकारण पाहता भविष्यात वणी विधानसभा मतदार संघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पकड सैल झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. परिणामी वणी विधानसभा मतदार संघात यापुढे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्यातरी ‘होता युती – आघाडी, नेत्यां – कार्यकर्त्यांची थंड झाली नाडी.’ असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.