पत्रावळी – द्रोण तयार करण्यासाठी स्टेपलचा वापर

जनावरांच्या जीवाला धोका

0 343

वि. मा. ताजने, वणी: अल्प प्रमाणात का होईना झाडांच्या पानांचा वापर द्रोण – पत्रावळीसाठी आजही केला जातो. सर्वपित्री दर्श अमावस्या, अक्षय तृतीया किंवा श्राद्ध आदी प्रसंगी आवर्जून अशा पानांच्या पत्रावळीत जेवण केले जाते. नेमका याच संधीचा फायदा घेत अनेकजण पात्र बाजारात विक्रीसाठी आणतात. मात्र द्रोण -पत्रावळी शिवण्यासाठी स्टेपलचा सर्रास वापर होत आहे. यामुळे जनावरांच्या आरोग्याला बाधा पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पूर्वी सार्वजनिक जेवणावळी असो किंवा घरगुती समारंभ झाडांच्या पानांच्या पत्रावळीचा वापर आवर्जून व्हायचा. गरिबांच्याच नव्हे तर मध्यमवर्गीयांच्या लग्न प्रसंगी पत्रावळ एक अविभाज्य अंग होती. वडाची पाने, कुडाची पाने, धामणीची पाने, पळसाची पाने, घोगुर्लीची पाने द्रोण -पात्र तयार करण्यासाठी वापरली जात. पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाची काडी किंवा बांबूच्या शिलकांचा वापर केला जायचा.

काही घरी समारंभ नव्हे तर दररोजच्या जेवणाला सुध्दा पत्रावळीचा वापर होत असे. पत्रावळी वापरामुळे जेवल्यावर बायकांना भांडी घासायचा त्रास कमी व्हायचा. तसेच जनावरांनाही पात्रांपासून अन्न मिळत होते. मात्र दिवसेंदिवस वनांच्या होणाऱ्या ऱ्हासामुळे पाने मिळणे कठीण झाले. म्हणून कागदी किंवा कोटिंग केलेल्या पत्रावळीचा वापर केला जाऊ लागला. यापासूनही जनावरांना बाधा पोहोचते.

मात्र यापेक्षाही स्टेपलचा वापर केलेल्या द्रोण – पत्रावळी जनावरांना अत्यंत घातक ठरू शकते. जेवणाची उष्टी पात्र खुल्या जागेवर टाकली जाते. जनावरे त्यावर ताव मारतात. अशावेळी पत्रावळी तयार करण्यासाठी वापरलेल्या पिना जनावरांच्या पोटात जाऊन आतडीला इजा होऊ शकते. कदाचित एखादी सैल झालेली पिन अन्नातून मानवाच्याही पोटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून द्रोण – पत्रावळी घेताना खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments
Loading...