पुरुषोत्तम नवघरे, वणी: वेळ माणसांना वेगळं करतो… पण मैत्री आठवणींतून कधीच दूर जात नाही. लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीच्या प्रांगणात नुकताच तोच जादुई क्षण पुन्हा जिवंत झाला—जेव्हा 25 वर्षांपूर्वी एकाच बाकावर बसलेले, एकाच कॅन्टीनमध्ये हसलेले आणि एकाच स्वप्नांसाठी झटलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र आले. कुणाच्या केसांमध्ये पांढरेपण, कुणाच्या चेहऱ्यावर आयुष्याच्या जबाबदाऱ्यांच्या रेषा… पण डोळ्यांत मात्र आजही तीच तरुणपणाची चमक होती. जुन्या वर्गात पाऊल टाकताच आठवणींचा पूर उसळला आणि त्या भावनांनी माजी प्राचार्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांचे डोळे पाणावले. ही केवळ भेट नव्हती; ती होती हरवलेल्या काळाशी पुन्हा हातमिळवणी करणारी, मैत्रीच्या अनमोल धाग्यांनी विणलेली एक भावूक कहाणी…
लोटी महाविद्यालयात नुकताच झालेला स्नेहमीलन सोहळा एखाद्या लग्न समारंभासारखा रंगला. पाहुण्यांच्या स्वागतासाठी बँड वाजवण्यात आला, फुलांच्या वर्षावात माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सभागृहात आगमन झाले. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. गीत गायन, कविता वाचन, नृत्य आणि खेळांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना नवसंजीवनी मिळाली.
महाविद्यालयाचे जुने वर्ग, ग्रंथालय व परिसर पाहून अनेकजण भावूक झाले. माजी प्राचार्यांच्या डोळ्यांतही आठवणीने पाणी आले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. त्यांनी पहिल्यांदाच महाविद्यालयात स्नेहमीलन सोहळा घडल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या मैत्रीचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य प्रसाद खानझोडे, प्रा. अनिल हुड, प्रा. सुधारक रेड्डी, डॉ. अजय देशपांडे, सहसचिव अशोक सोनटक्के, डॉ. संदीप तुंडूरवार, डॉ. शंकर वऱ्हाटे, डॉ. रेखा पवार, डॉ. अभिजित अणे, प्रा. उमेश व्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. संतोष डाखरे यांनी केले. प्रास्ताविक प्रविण खानझोडे व वैशाली पाटिल यांनी संयुक्तरित्या केले, तर आभार गोपाल गव्हाणे यांनी मानले. 25 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचा उत्सव साजरा केला. हा सोहळा महाविद्यालयाच्या इतिहासात मैत्रीच्या बंधनाला नवा आयाम देणारा ठरला.



Comments are closed.