वॉटर एटीएम बंद, प्रशासन सुस्त; पाण्यासाठी फरफट

वणीकरांवर पाण्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार

विवेक तोटेवार, वणी: नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी माफक दरात उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेली वॉटर एटीएम व्यवस्था सध्या केवळ नावापुरतीच उरल्याचे चित्र आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 13 व 14 सह अनेक भागांतील वॉटर एटीएम गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही ठिकाणी तर पाणी देणाऱ्या एटीएमलाच थेट कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे स्वस्त दरात पिण्याचे पाणी मिळण्याची अपेक्षा असलेल्या नागरिकांना आता पर्यायी स्रोतांकडून अधिक पैसे मोजून पाणी घ्यावे लागत आहे.

5 रुपयांत 15 लिटर पाणी देणारी सुविधा ठप्प
सेवानगर ते गोकुळनगर परिसरात नागरिकांना 5 रुपयांत 15 लिटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेली वॉटर एटीएमची सुविधा सध्या बंद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रभाग क्रमांक 13 आणि 14 मध्येही जवळपास सर्वच वॉटर एटीएम बंद अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमुळे नागरिकांना माफक दरात शुद्ध पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र एटीएम बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी खासगी पर्यायांचा आधार घ्यावा लागत आहे.

शुद्ध पाणी महागले
वॉटर एटीएम बंद असल्याने काही ठिकाणी नागरिकांना 10 रुपयांत पाणी विकले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी नगरसेवकांकडूनच पाणी विक्री केली जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. या आरोपांची नगर परिषद प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करून सत्यता स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. जर नगर परिषदेची सार्वजनिक सुविधा बंद असताना त्याच परिसरातील नागरिकांना जास्त दराने पाणी घ्यावे लागत असेल, तर या संपूर्ण व्यवस्थेचा नेमका लाभ कोणाला आणि फटका कोणाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या एटीएमला महिनोन्महिने कुलूप लावून ठेवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. अनेक नागरिकांनी याबाबत नगरसेवकांकडे तक्रारी केल्याचे सांगितले जाते. मात्र संबंधित वॉटर एटीएमची देखभाल करणारा ठेकेदार दुरुस्ती करीत नसल्याचे नगरसेवकांकडून सांगण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, ठेकेदार दुरुस्ती करीत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी नगर परिषदेची नाही का?

वॉटर एटीएमची संकल्पना प्रामुख्याने सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना कमी दरात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली. मात्र हीच सुविधा बंद असल्याने नागरिकांना पर्यायी स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासारख्या अत्यावश्यक गरजेसाठी नागरिकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने ‘स्वस्त पाण्याची सुविधा बंद आणि महाग पाण्याची वेळ’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आर्थिक भार सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर पडत असल्याचा आरोप होत आहे.

नगर परिषद प्रशासनाने शहरातील बंद असलेली सर्व वॉटर एटीएम तातडीने सुरू करावीत, संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून करारातील अटी व शर्तींच्या आधारे आवश्यक ती कारवाई करावी आणि नागरिकांना पूर्वीप्रमाणे 5 रुपयांत 15 लिटर स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Comments are closed.