शहरात सुरू असलेले मटका अड्डे तात्काळ बंद करा, मुख्यमंत्र्यांना साकडे

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली मटका पट्टी तात्काळ बंद करावी अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे करत याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी व चौकात मटका पट्टीचे अड्डे असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी वणी शहरातील 4 ठिकाणी चालणा-या मटका अड्यावर धाड टाकत चौघांना अटक केली तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झालेत. विशेष म्हणजे शहरात जरी पोलिसांची कारवाई होत असली तरी ग्रामीण भागात मात्र अद्यापही पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. राजूर आणि कायर या ठिकाणी राजरोसपणे मटका सुरू असल्याची माहिती आहे.

वणी शहरात गेल्या काही काळापासून अवैध धंदे फोफावले असून यात सर्वाधिक मटका पट्टीचा व्यवसाय अव्वल स्थानी आहे. दीपक चौपाटी, लालगुडा फाटा, पंचशिल नगर, ब्राम्हणी फाटा, एकता नगर, सिंधी कॉलोनी, लाल पुलीया, भाजी मार्केट, शात्री नगर, रंगनाथ नगर, खडबडा मोहल्ला यासह चक्क नगर परीषदेच्या उर्दु शाळेच्या बाजुला सुद्धा अवैध मटका पट्टी खुलेआम सुरू आहे. असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या मटक्याच्या नादाला शहरातील गरीब सह व मध्यमवर्गीय लोकही लागलेत. वणी शहरात मोठ्या प्रमाणात विविध कामासाठी ग्रामीण भागातून लोक येतात. हे देखील मटका पट्टी लावण्यात आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असून मटका पट्टीच्या नादाने काहींचे कुटुंब देखील उद्ध्वस्त झाले आहे.

राजूर आणि कायर येथील मटका पट्टीवर कारवाई कधी?
एकता नगर, दीपक चौपाटी, सिंधी कॉलोनी, पंचशील नगर येथे सुरू असलेल्या मटका पट्टीवर शुक्रवारी वणी पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले. अशा कारवाई पोलिसांद्वारे कायमच केल्या जातात मात्र कारवाईच्या दुस-या दिवशीपासून पुन्हा याच ठिकाणी मटका सुरू होत असल्याचे दिसून येते. यासोबत ग्रामीण भागातील राजूर आणि कायर येथे मोठ्या प्रमाणात मटका फोफावला आहे. याकडे कधी कारवाई होईल ? त्यांना का अभय दिले जात आहे? असा सवाल आता जात आहे.

शहरातील अवैध धंदे व मटका पट्टी तात्काळ बंद करावी यासाठी मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. यावर पोलीस काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.