मोबाईल पकडणा-या हातात कुंचला देण्याची सृजनशील धडपड

0

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी), वणी: कायदा व सुव्यवस्था सांभळणारी पोलीस म्हटले की अंगावर खाकी गणवेश, तोंडामध्ये शिट्टी आणि हातात दंडुका असे सर्वसाधारण चित्र आपल्या डोळ्यासमोर चटकण येते. पण या खाकी वर्दीच्या आतसुद्धा कलावतं दडले असतात. याची सुखद अनुभुती वारली चित्रकला कार्यशाळेच्या निमित्ताने नुकतीच अनुभवता आली. मुळतः वणीचे असलेले आणि सध्या यवतमाळ पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल शेखर वांढरे हे असेच एक मनस्वी कलावंत. वारली आदिवासींची परंपरागत चित्रकला विद्यार्थ्यांना शिकवण्याचा वसाच त्यांनी उचलला आहे. याचाच एक दृश्य परिणाम म्हणजे 23 व 24 मार्च रोजी वणीच्या श्रीमती नुसाबाई चोपणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा होय.

आजचे लहानगे विद्यार्थ्यांच्या हातात सुद्धा पुस्तकांऐवजी अधिक वेळ मोबाईल विसावताना दिसतो. आपल्या विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वापर केवळ शैक्षणिक कामासाठीच करण्याचा कल असावा. असे आग्रही मत असणारे या विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुनील चोपणे हे आपल्या सहकार्यांच्या मदतीने विविध उपक्रम राबवित असतात. आजच्या विद्यार्थ्यांची चित्रकलेकडे असणारी ओढ कमी होत असल्याचे पाहून या विद्यालयाने ‘वारली चित्रकला’ अवगत व्हावी म्हणून शेखर वांढरे यांना पाचारण केले. दोन दिवस झालेल्या या कार्यशाळेत नुसाबाई चोपणे विद्यालयाचे व बालविद्या मंदिर प्राथमिक शाळा वणीचे असे एकूण जवळपास 100 विद्यार्थी सहभागी झाले होते. या चिमुरड्यांची बोटं वारली चित्रकला शिकतांना त्यांच्या मनासह आणि कल्पना विश्वाच्या भरारीसह विविध संकल्पना आणि रंगांमध्ये रंगून गेली होती.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना वारली चित्रकलेची आवड लावताना शेखर वांढरे यांनी वारली चित्रकलेचा इतिहास सुद्धा विद्यार्थ्यांना उलगडून दाखवला. तब्बल दोन दिवस चित्र काढताना हे विद्यार्थी अक्षरशः तहान भूक आणि सतत हातात असलेला मोबाईल सुद्धा विसरत होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शेखर वांढरे यांनी एकाद्या जागरुक शिक्षकाप्रमाणे भूमिका बजावताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचीसुद्धा माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या निमित्ताने वारली चित्रकलेच्या प्रदर्शनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. आता आम्ही वारली चित्रकलेत अधिक रस घेणार अशी प्रतिक्रिया या चिमुरड्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या निमित्ताने बोलताना आपण आता वारली आदिवासी बोलीचाही अभ्यास करीत असल्याचे वारली चित्रकला कलावंत शेखर वांढरे यांनी ‘वणी बहुगुणी’ला सांगितले. आमच्या उपक्रमशील शाळेत शेखर वांढरे यांची ही कार्यशाळा वेगळाच सृजनशिलतेचा अनुभव देऊन गेली अशी मनोज्ञ प्रतिक्रिया प्राचार्य सुनील चोपणे यांनी व्यक्त केली.

या कार्यशाळेच्या आयोजनात प्राचार्य सुनील चोपणे यांच्या मार्गदर्शनात धनराज काथवते, भारती चोपणे, नयन परांडे, प्रमोद थेरे, यांचेसह सर्व शिक्षकांनी व कर्मचा-यांनी पुढाकार घेतला.

लिंकवर क्लिक करून पाहा कार्यशाळा आणि चित्र प्रदर्शनीचा व्हिडीओ….

Leave A Reply

Your email address will not be published.