मारेगावातील प्रभाग क्र.13 मधील अतिक्रमणाचा विषय तापला

नगरसेवकासोबत बसणार 87 वर्षीय आजोबा उपोषणाला

भास्कर राऊत, मारेगाव: प्रभाग क्र. 13 मधील दुकानदाराने केलेले अतिक्रमण नगरपंचायतने त्वरित काढावे, अन्यथा त्या अतिक्रमणाविरोधात आम्ही उपोषणाला बसू असा इशारा नगरसेवक अनिल गेडाम यांनी दिला होता. त्यांच्यासह आता एका 87 वर्षीय आजोबाही उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मारेगाव येथील वातावरण तापलेले असून नगरपंचायत काय भूमिका घेते याकडे शहरवासियांचे लक्ष लागलेले आहे.

मारेगाव शहरातील प्रभाग क्र. 13 मध्ये ओमप्रकाश खुराणा यांचा प्लॉट आहे. त्यांच्या प्लॉटला लागून राहुल अरुण जयस्वाल यांचे कविता टाईल्स नावाचे दुकान आहे. जयस्वाल यांनी अतिक्रमण करून या खुराणा यांच्या प्लॉटवर जाण्यायेण्यासाठी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे. तसेच या दुकानदाराने दुकानासमोरील खाली जागेवर अतिक्रमणसुद्धा केलेले आहे.

पावसाळ्यात समोरील नालीने वाहून जाणारे पाणी अडून ते शेजारी असणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरू शकते. त्यामुळे शेजारील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात नगरसेवक या नात्याने अनेक तक्रारी दिल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

नगरपंचायतने 15 जून पर्यंत हे अतिक्रमण काढले नाही तरी 15 तारखेपासूनच उपोषणाला बसण्याचा इशारा नगरसेवक अनिल गेडाम आणि 87 वर्षीय आजोबा ओमप्रकाश करमनारायण खुराणा यांनी नगरपंचायतला दिलेला आहे. सदर 87 वर्षीय आजोबा हे मधुमेह व बिपीने ग्रस्त आहे. त्यांच्यावर उपोषणाची वेळ येणे ही शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे.

न्यायालयाच्या निकालानंतरच कारवाई – नगर पंचायत
खुराणा वर्षेस जयस्वाल यांचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. आजपर्यंत एक तारीख झालेली आहे. न्यायालयामध्ये प्रकरणाची सुनवाई सुरु असून जोपर्यंत न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत यावर काहीही करता येत नाही.
– अभिजित वायकोस, मुख्याधिकारी न. पं. मारेगाव

————————————-

आम्हाला सातत्याने धमकी – जयस्वाल
काही व्यक्ती येऊन आम्हाला नेहमी शिवीगाळ करीत असतात. तसेच वारंवार धमकीही देत असतात. शहरात सर्वत्र अतिक्रमण असताना फक्त माझ्याच बाबतीत ही भूमिका का घेतली जाते हे समजण्यापलीकडे आहे. मला नेहमी मानसिक त्रास दिला जातो. मी कायद्याने सर्व काही करेल. माझेवर अन्याय होत असेल तर मी सुद्धा कुटुंबियांसोबत उपोषणाला बसणार.
– विनीत जयस्वाल, राहुल जयस्वाल यांचे भाऊ.

नगर पंचायतीने न्यायालयाच्या निकालनंतरच कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे नगरसेवक उपोषणावर ठाम आहे. त्यामुळे या प्रकरणी काय होणार याची मारेगावात उत्सुकता लागली आहे. 

हे देखील वाचा:

बळीराजा कृषी केंद्राचे उद्घाटन, वाजवी दरात बि-बियाणे, खते उपलब्ध

देशातील प्रख्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम आता वणीत

Comments are closed.