सोमवारी वणी नगरपरिषद निवडणूकसाठी आरक्षण सोडत

कोणता प्रभाग राहणार राखीव, होणार फैसला...

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यातंर्गत वणी नगरपरिषद सदस्य पदांची आरक्षण सोडत सोमवार, 13 जून रोजी काढण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या 14 प्रभागातुन 29 सदस्यांसाठी येथील महसूल भवनमध्ये सकाळी 10 वाजता ईश्वरचिट्ठीने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे 11 जून रोजी सदस्यपदांच्या आरक्षण सोडतीकरिता नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. 13 जून रोजी नगरपरिषद सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला व सर्वसाधारण महिला प्रवर्गातील महिला या पदांचा समावेश आहे. 15 जून रोजी आरक्षणाची अधिसूचना नागरिकांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविणेकरिता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी 15 जून ते 21 जून असणार आहे. आरक्षण सोडतीचा अहवाल संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे 24 जूनपर्यंत पाठविण्यात येईल. 29 जूनपर्यंत विभागीय आयुक्त नगरपरिषद व नगरपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणास मान्यता देतील.

1 जुलैपर्यंत सदस्यपदांच्या आरक्षणाची अधिसूचना नागरिकांच्या माहितीसाठी वृत्तपत्र व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा:

देशातील प्रख्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम आता वणीत

चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज

 

Comments are closed.