कोलेरा गावात शिरले पाणी, अनेक घरे गेली पाण्यात

गावक-यांचा वेकोलिविरोधात संताप, संजय खाडे यांनी दिली गावाला भेट

 

बहुगुणी डेस्क, वणी: सतंतधार पावसामुळे कोलेरा (पिंपरी) येथील काही घरे पाण्यात गेलीत. या गावाजवळून जाणा-या नाल्याजवळच वेकोलिने डम्पिंग केली आहे. त्यामुळे हा नैसर्गिक नाल्याचा मार्ग बंद झाला व नाल्याचा प्रवाह बदलला. परिणामी तीन दिवसांच्या पावसामुळे पाणी गावात शिरले. याचा गावातील काही घरांना फटका बसला, असा आरोप गावकरी करीत आहे. आज दुपारी संजय खाडे यांनी सहका-यांसह गावाला भेट देत गावक-यांशी चर्चा केली. ही नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आपत्ती असून याला वेकोलि जबाबदार आहे. त्यामुळे वेकोलिने तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कोलेरा येथील खाणीतून निघणारी माती व वेस्ट वेकोलि प्रशासनाने गावाजवळ डम्प केली आहे. याच ठिकाणी एक नैसर्गिक नाला वाहतो. मात्र डम्पिंगमुळे नाला बुजला आहे. गेल्या तीन दिवसांपासून वणी व परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. डम्पिंगमुळे नाल्याचा प्रवाह बदलला गेला व पाणी गावात शिरले. तसेच आठ ते दहा घरांना याचा फटका बसला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे संजय खाडे यांनी सहका-यांसह गावाला भेट दिली. त्यांनी गावक-यांशी याबाबत चर्चा केली. पुरामुळे राजू कांबळे, ज्ञानेश्वर पिंपळकर, देविदास वाघमारे, विशाल कुरेकर, प्रफुल्ल झाडे, प्रकाश झाडे, सोनू पिदुरकर, विलास झाडे, बबनराव पिदुरकर, अतुल पिदुरकर, चंद्रकला टेकाम, गजानन पिदुरकर इत्यादींच्या घरात पाणी शिरले आहे.

नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आपत्ती – संजय खाडे
आज कोलेरा गावात जी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. वेकोलिने नैसर्गिक नाला बुजवल्याने गावात पाणी शिरले आहे. ही मानव निर्मित चूक असून वेकोलि याला सर्वस्वी जबाबदार आहे. वेकोलिने त्वरित पूर प्रभावीत घरांना आर्थिक मदत केली पाहिजे. तसेच नुकताच पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वेकोलिने डम्पिंगवर तोडगा काढला पाहिजे.

या पूरपरिस्थितीमुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच गावात पाणी साचल्याने रोगराई पसरण्याची देखील भीती गावकरी व्यक्त करीत आहे. त्यामुळे वेकोलिने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहे. यावेळी तेजराज बोढे, अशोक चिकटे, प्रफुल्ल भोयर यांच्यासह गावकरी उपस्थित होते. 

Comments are closed.