राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जलसाक्षरता कार्यशाळा
विवेक तोटावार, वणी: दिवसेंदिवस पाण्याची खोल- खोल जात असलेली पातळी, पाण्याचा होणार दुरुपयोग यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. त्यामुळे जल संधारण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन अमरावती विभागाचे जलनायक डॉ. नितीन खर्चे यांनी केले. ते येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित जलसाक्षरता कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष तथा नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार हे होते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह प्रशांत भालेराव यांनी केले. संघाच्या सेवा विभाग व समग्र ग्राम विकासाच्या माध्यमातून दि.22 एप्रिलला यवतमाळ येथे विभागीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. खर्चे यांनी सर्वप्रथम पाण्याचे महत्व सांगून त्याची उपयोगिता पटवून दिली. त्यांनी पाणी या विषयावर जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या प्रयोगाचे सचित्र सादरीकरण केले. त्यानंतर त्यांनी स्वतः राबवलेल्या विश्वास नगर पॅटर्नचे चलचित्र दाखवून वॉटर हार्वेस्टिंगचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले. त्यासोबत सार्वजनिक ठिकाणी व प्रत्येक घरी पावसाच्या पाण्याचा संचय कसा करायचा भूजल पातळी कशी वाढवायची हे उपस्थितांना समजावून सांगितले.
या कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप करताना कासावार म्हणाले की, भविष्यात तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल यावर अनेक विचारवंतांचे एकमत आहे. त्याची झलक आताच्या पाण्याच्या दुरभीक्ष्या मध्ये जाणवत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीतच जिरला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू या असे आवाहन केले.
या कार्यशाळेचे संचालन दीपक नवले यांनी केले. आभार कृष्णा पुरवार यांनी मानले. या कार्यशाळेत शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, ले आउट धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.