बहुगुणी डेस्क, वणी: खेड्यावर मालवाटप करून वसुलीचे पैसे घेऊन वणीला परत येणा-या मालवाहूच्या वाहन चालक व हेल्परला मारहाण करून चौघांनी लुटले. मारेगाव (कोरंबी) गावाजवळ गुरुवारी संध्याकाळी 6.15 वाजताच्या सुमारास ही वाटमारीची घटना घडली. या घटनेत 80 हजारांची रोख रक्कम व मोबाईल चोरट्यांनी लुटला. रासा-वणी हा रस्ता रहदारीचा आहे. ऐन संध्याकाळी ही वाटमारीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून या मार्गावरून जाणारे दहशतीत आले आहे.
जितेंद्र तुळशीराम रिंगोल (32) हा मुर्धोनी ता. वणी व लक्ष्मण शंकर मेश्राम (21) रा. पंचशील नगर वणी हे दोघेही सिंधी कॉलोनीतील राजेश तारुणा यांच्याकडे काम करतात. जितेंद्र हा चालक तर लक्ष्मण हा मदतनीस म्हणून काम करतो. त्या दोघांकडे खेडेगावात ऍपेने माल पोहोचवणे व मालाच्या पैशाच्या वसुलीचे काम आहे.
गुरुवारी दिनांक 16 मे रोजी हे दोघेही ऍपे (MH25 AK0997) हे मालवाहक घेऊन रासा येथे गेले होते. त्यांनी रासा, घोन्सा, खडकडोह, दुर्गापूर, झरी, येथे माल देऊन त्यांच्याकडून मालाचे पैसे घेतले. मालाचे 80,700 रुपये घेऊन ते परत वसुलीसाठी घोन्सा व रासा येथे आले. मात्र वसुली न झाल्याने संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ते राशावरून परत वणीला येत होते.
कोरंबी मारेगाव गावाच्या आधी त्यांच्या वाहनाच्या समोर डबलसीट असलेल्या दोन दुचाकी आल्या. या दोन्ही दुचाकींनी मालवाहक वाहन थांबवले. चौघापैकी एकाने मदतनीस लक्ष्मण याला गाडीबाहेर काढून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. सहका-याला विनाकारण मारहाण होताना पाहून चालक जितेंद्र वाहनाबाहेर आला. मात्र चौघापैकी एकाने त्याच्या डोक्यावर अवजड वस्तूने प्रहार केला. त्यामुळे तो खाली पडला. त्याने जितेंद्र याच्या गळ्यात लटकवलेली पैशाची बॅग हिसकावली. तसेच लक्ष्मण याच्या जवळचा मोबाईल हिसकावला व ते चौघेही पळून गेले.
हे सर्वजण 30 ते 35 वयोगटातील होते. त्यांच्या दोन्ही दुचाकी या विनानंबरच्या होत्या. त्यांनी 80 हजार 700 रुपये व 8 हजारांचा मोबाईल असा एकूण 88700 रुपयांचा ऐवज लंपास केला. जितेंद्र यांनी रात्री वणीला परत येत वणी पोलीस स्टेशन गाठले व याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी 4 अज्ञात आरोपींविरोधात भादंविच्या कलम 394 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.