बेबंदशाही: वेकोलिने बदलला नाल्याचा प्रवाह, शेकडो एकर शेती पाण्याखाली
गावकरी संतप्त, घोन्सा येथील रहिवाशांचे रास्ता रोको आंदोलन
जितेंद्र कोठारी, वणी : वेकोलिच्या घोन्सा ओपनकास्ट प्रशासनाने बेकायदेशीरपणे नैसर्गिक नाल्याच्या प्रवाह बदलल्यामुळे घोन्सा येथील शेतकऱ्यांचे शेकडो एकरवरील पीक पाण्याखाली गेले आहे. वेकोलि प्रशासनाच्या बेबंदशाही धोरणाविरुद्ध गावकऱ्यात तीव्र रोष निर्माण झाला आहे. वेकोलिच्या अनागोंदी कारभारामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसानभरपाईसाठी गावकरी एकवटले आहे. आज घोन्सा येथील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करत वेकोलि प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
घोन्सा येथील पीडित शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वणी घोन्सा झरी मार्गावर जगलोन नाला व फुलोऱ्या नाला वेगवेगळ्या प्रवाहाने जात होते. पावसाळ्यात या नाल्याचे पाणी ओपॅनकास्ट कोळसा खाणीत जाऊ नये म्हणून वेकोलि प्रशासनाने 6 एप्रिल 2022 रोजी बेकायदेशीर रित्या दोन्ही नाले एकत्र करून त्याचा प्रवाह बदलला. तसेच कोळसा खाणीचे ओबीआर रस्त्याच्या बाजूने टाकले.
बांधकाम विभाग व सिंचन विभागाची परवानगी न घेता वेकोलि प्रशासनाने मुख्य रस्ता खोदून नाल्याच्या प्रवाह गावाकडे वळविला. मागील 3 दिवसांपासून घोन्सा परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. दोन्ही नाले एकत्र झाल्याने पूर येऊन नाल्याचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरले. परिणामी वणी-घोन्सा मार्गावर वाहतूक ठप्प झाली.
घोन्सावासीयांचे रास्ता रोको आंदोलन
वेकोलीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी घेउन घोन्सा येथील नागरिकांनी आज रविवार 10 जुलै रोजी रस्ता रोको आंदोलन केले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार वामनराव कासावार यांनी घोन्सा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. वेकोलिचे क्षेत्रिय उप प्रबंधक याना पाचारण करुन प्रवाह बदलण्यात आलेल्या नाल्याचे प्रवाह पूर्ववत करणे व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश आमदार बोदकुरवार यांनी दिले.
Comments are closed.