‘दादांना’ वारंवार स्पष्टीकरण देण्याची गरज का ?
इथे शेवाळला खोटेपणा.... दादांच्या नाटकाचा अंक दुसरा...
जब्बार चीनी, वणी: नुकतच पार्टीवाल्या दादांचं अनपेक्षीतरित्या स्पष्टीकरण आलंय. त्यामुळे वणीतील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या आधीही दादांनी एकदा स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे वारंवार स्पष्टीकरण देऊन दादा नेमकं काय साध्य करीत आहे असा प्रश्न सध्या वणीकरांना पडला आहे.
पहिल्या स्पष्टीकरणात शब्दांची माळ गुंफत वणीकरांना मोठे स्पष्टीकरण दिले. परंतु तो निव्वळ शब्दांचा खेळ होता हे वणीकरांना वाचता क्षणीच कळून चुकले. एखाद्या गोष्टीला एखादं गोंडस नाव दिल्याने त्याचा अर्थ बदलत नाही. मग पार्टीला गेट टुगेदर म्हणा की स्नेहमीलन म्हणा, शब्द जरी वेगवेगळे असले तरी कायद्याच्या कसोटीवर मोठ्या संख्येंने लोक गोळा करण्याचाच प्रकार दादांनी केलाच होता. विशेष म्हणजे हे संचारबंदी आणि जमावबंदी लागू असताना केले गेले. कोरोनाच्या काळात अशा काही गोष्टी करण्यात त्यांना काहीच गैर वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले असले तरी सर्वसामान्य वणीकरांना मात्र ते गैर वाटणारच आणि त्याची भीती देखील वाटणार.
योद्ध्यांना जिलेबी, पाहुण्यांना रसमलाई
स्पष्टीकरणात त्यांनी साईटवर काम करणा-या मजुरांचे मनोबल वाढवण्यासाठी आपण सरहदीवर वगैरे गेलो, अशा लांब लांब फेकल्यात. जर त्यांना मजुरांचा इतकाच कळवळा होता, ते त्यांना योद्धे वाटत असले तरी त्यांनी पाहुण्यांना जी रसमलाई खाउ घातली, ती ते 15-20 मजूररुपी योद्धांना खाऊ घालू शकले नाही. पाहुण्यांना वेगळा मेन्यू आणि मजुरांना मसाला भात जिलेबी. विशेष म्हणजे त्यांनी हा ‘मजुरांसाठी’चा मेन्यू म्हणूनच ऑर्डर केला होता. त्यांनी स्वत:हून दाखवलेला हा दिलदारपणा सगळ्यांनी वाचला. आजच्या काळात इतका दानशूरपणा क्वचितच आढळून येतो.
दादांच्या पूर्वजांच्या साहित्य सेवेने वणी शहर पुनित झाले. याबद्दल कोणाचेही दुमत राहू शकत नाही. परंतु वर्तमान स्थितीत शहराशी केवळ व्यावसायिक संबंध ठेवलेल्या वारसांना पूर्वजांच्या पुण्याईवर वणीकरांनी तरी का म्हणून गोंजारावे? अनेक वर्षे वणीची नाळ तुटल्यानंतर केवळ व्यवसायाच्या पूनर्वसनासाठी वणीत दाखल झालेल्या दादांनी संबंधीत संस्था, बॅंका, पतसंस्था यामधून जो आर्थिक स्त्रोत मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यात उडालेल्या गोंधळाबाबत न बोललेलेच बरे.
कोरोनाचा वणीत शिरकाव झाला हा वणीकरांना एक धक्का होता. इथले लोक नसल्या गोष्टी ओढत ताणत नाही. दुर्दैवी गोष्टी तर नाहीच, त्या विसरून पुढे जातात. झाले गेले विसरून एकमेकांच्या पाठिशी उभे राहणे हे वणीकरांचे वैशिष्ट आहे. मात्र ज्या वेळी गरज होती त्या वेळी दादांनी नागपूरला धूम ठोकली. आता सर्व निस्तरल्यावर मात्र त्यांना कृतज्ञता व्यक्त करावी लागत आहे. बेजबाबदारी, हलगर्जीपणा दाखवणा-या व ऐन वेळी पळ काढणा-या दादांकडून वणीकरांना विशेष अशी अपेक्षा नाही हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
संपूर्ण जगाला हादरवून सोडणा-या कोरोनाला दादांनी चिल्लर संबोधून नेमके काय साध्य केले हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. नेमका त्यांचा हा ‘चिल्लरपणा’ त्या वेळी प्रत्येकाच्या चर्चेत होता. त्यावर अनेक चर्चा झाली. शासन दरबारी निवेदन देण्यात आली. आजच्या घडीला दादांनी खाजवून खरुज का काढला, हे कळायला वणीकरांना मार्ग नाही.
कोणतेही संकट आले तरी वणीकर जनता सर्वकाही विसरून एकमेकांच्या पाठिशी उभे होते. ही वेळ पाठिशी उभे राहण्याची असल्याने वणीकरांनी यात कुणालाही दोष तर दिलाच नाही उलट तो विषयही ताणला नाही, दरम्यान मीडियाने कोविड केअर सेन्टरमध्ये काय परिस्थिती आहे. त्यांना योग्य उपचार मिळतोय की नाही. तिथे योग्य ती सुविधा आहे की नाही या गोष्टींकडे सर्व लक्ष दिले. दादा वरिष्ठ स्तरावर मीडियाशी चांगले संबंध जुळवून ठेवतात. यावेळी दादांचा ‘कारनामा’ जवळपास सर्वच प्रकारच्या मीडियात प्रसिद्ध झाला. मात्र नवीन खुलाश्यात त्यांनी खोटे वृत्त प्रकाशीत केल्याचा आरोप करत संपूर्ण मीडिया व पत्रकारांनाच खोटे पाडले आहे. याआधीही स्थानिक प्रत्रकारांनी एक दोन प्रकरणात व्यावसायिक कुंडली बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता मीडियातील वरिष्ठांकडून दबाव आणून स्थानिक पत्रकारांची मुस्कटदाबी देखील केलेली आहे.
यावेळी दादांनी कृतज्ञेच्या आडून बाण मारला. सध्या पावसाळा सुरू आहे. अशा वातावरणात शहरात, घरावर, कॉम्प्लेक्समध्ये, रस्त्यावर अनावश्यक ठिकाणी झालेले शेवाळं चांगलीच डोकेदुखी ठरतात. मात्र अशा वेळी हे संकट दुस-यांना दाखवण्याऐवजी या शेवाळावरून घसरून पडण्याची वेळ स्वत:वरच येऊ शकते हे त्यांनी विसरू नये. वेळोवेळी गोंधळ वाढवल्याने त्यांच्याच प्रतिमेला तडा जावून त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत होण्याचा धोका अधिक आहे, हे आता दादांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.