व्यसनी पती बळजबरी पाजायचा पत्नीला दारू

विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी पती, सासु, सासरे व ननंद यांच्या विरोधात मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लग्न झाल्याच्या अवघ्या एका महिन्यातच पती हा हुंड्याची मागणी करत पत्नीला सतत मारझोड करायचा. तसेच पत्नीला बळजबरी दारू पाजायचा, असा आरोपही पीडित महिलेने केला आहे. अखेर छळाला कंटाळून पत्नीने सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दिली. तक्रारीनंतर सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारी नुसार, पीडित महिला (21) ही चंद्रपूर येथील रहिवासी असून ती सध्या वणी तालुक्यातील एका गावात राहते. पीडितेचा 20 मे 2024 रोजी बल्लारपूर येथील एका 30 वर्षीय तरुणाशी चंद्रपूर येथे हिंदू रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. विवाहात मुलीच्या वडिलांनी जावयाला 2 लाख रुपयांचा हुंडा दिला. तसेच मुलीच्या अंगावर दागिने केलेत. विवाहानंतर अवघ्या एक महिन्यातच पीडित महिलेला सासुरवास सुरु झाला. पती, सासू, सासरे व ननंद तिला छोट्या छोट्या कारणांवरून त्रास द्यायचे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पत्नीला पाजायचा बळजबरी दारू
पीडित महिलेच्या पतीला लग्नाआधीपासूनच दारूचे व्यसन होते. मात्र ही बाब सासरच्या मंडळींनी लपवून ठेवली होती. लग्नानंतर पीडित महिलेचा पती हा रोज रात्री दारू पिऊन घरी यायचा. तो पत्नीला बळजबरी दारू पाजत होता. दारू न पिल्यास तो तिला शिविगाळ करीत मारझोड करायचा. तसेच तिचे सासरे हे सुनेवर तिचे वडील जादूटोणा करतात. त्यांनी माझ्या मुलावर जादूटोणा केला, असा आरोप करीत पीडितेला मानसिक त्रास द्यायचे.

पती हा पीडितेला नेहमी मारहाण करून घरून 2 लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावीत असायचा. जर पैसे आणले नाही तर घरी नांदवणार नाही, अशी धमकी द्यायचा. लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात सासरच्या मंडळींनी पीडितेला माहेरी पाठवले. पीडितेच्या आई वडिलांनी सासरच्या मंडळींना मुलीला घरी घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र त्यांनी जो पर्यंत दोन लाख रुपये देत नाही, तो पर्यंत मुलीला घेऊन जाणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर सासरची मंडळी पैसे दिल्याशिवाय नांदवायला तयार नसल्याने पीडितेने 3 सप्टेंबर 2024 रोजी मुकुटबन पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दिली.

त्यानंतर सदर प्रकरण हे महिला समेट कक्ष पांढरकवडा येथे गेले. तिथे पती पत्नीत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दोन्ही पक्षात समेट न झाल्याने अखेर मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये पीडितेचा पती, आई, वडील व ननंद विरोधात बीएनएसच्या कलम 3 (5) व 85 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवतीला मारला डोळा, मग त्याच्या पोटात उठला गोळा

भरधाव ट्रॅक्टरने तीन दुचाकींना उडवले, एक ठार

Comments are closed.