बहुमोल आणि बहुगुणी रानभाज्यांचा महोत्सव 9 ऑगस्टला
विविध रानभाज्या, रानफळं आणि रानमेव्यांची प्रदर्शनी आणि विक्री
सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः आषाढ-श्रावण महिन्यासोबतच रानमेवा सर्वत्र मिळतो. ग्रामीण भागात या भाज्या सगळ्यांना माहीत असतात. त्यामुळे याची तिथे सहसा विक्री होत नाही. शहरी भागात मात्र ज्यांना या भाज्यांचं महत्त्व माहीत आहे, ते चातकासारखी याची वाट पाहत असतात. आदिवासी आणि ग्रामीण पंरपरेत या रानमेव्याचं खूप महत्त्व आहे. हे लक्षात घेता जागतिक आदिवासीदिनाला रानभाजी महोत्सवाचं आयोजन 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नगरपालिकेच्या कल्याण मंडपम येथे हा महोत्सव होणार आहे. पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार या महोत्सवाचं उद्घाटन करतील.
पावसाळ्यांत दिवतीचे फूल, कोयलारी, मुरमाटे फूल, चिलीचे गोळे, अंबाडी, भुचवई, तरड कोतला, टाकळा, शेवरं, कंटोली, भारंगी, फोडशी, कुळू, तांदुळजिरा, दुडीची फुले, माठला, कुर्डू, घोळ / चिवळी किंवा चिवई, रानतोंडली, भुई पालक, रानशेपू, रानवांगी, रानदोडकी, रानभोपळे अशा विविध रानमेव्यांचा आनंद घेता येतो. या महोत्सवात आदिवासी बांधव आणि शेतकरी बांधव विविध रानभाज्या आणणार आहेत. या विविध रानभाज्या, रानफळं आणि औषधी वनस्पतींचं प्रदर्शन आणि विक्री या महोत्सवात होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन वणी तालुका कृषी अधिकारी आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)ने केलं आहे. नागरिकांनी या महोत्सवाला भेट देण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.