महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह, गावात खळबळ

सकाळी शेतात कामाला गेल्यानंतर दुपारी विहिरीत मृतावस्थेत

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुरई येथे बुधवारी दुपारी 2.30 वाजता एका महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. मृतक महिलेचे नाव अविता विजय परसुटकार (अंदाजे वय 33) असे आहे. ती नेहमी प्रमाणे सकाळी शेतात कामासाठी गेली होती. मात्र दुपारी तिचा मृतदेहच आढळला. घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या हा अपघात आहे की आत्महत्या याचा पोलीस तपास करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अविता या कुरई येथील रहिवासी होत्या. त्या त्यांच्या कुटुंबासह राहायच्या. कुरई शिवारात त्यांची शेती आहे. बुधवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी त्या सकाळी नेहमीप्रमाणे पतीसह शेतात कामासाठी गेल्या होत्या. मात्र दुपारी त्या शेतात नव्हत्या. त्यांच्या पतीने त्यांचा शोध घेतला असता विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने याची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यांच्या पश्चात पती विजय नानाजी परसुटकार, तीन मुली, सासू असा आप्त परिवार आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार API शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्या पाणी काढताना त्यांचा तोल गेला की इतर काही कारण आहे, याचा तपास पोलीस करीत आहे. 

Comments are closed.