दारुबंदीसाठी महिला धडकल्या पोलीस स्टेशनवर

मूर्धोनी गावात अवैध दारु विक्रीमुळे गावाची शांतता भंग

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मूर्धोनी (पळसोनी) गावात अवैधरित्या सुरु देशी दारू विक्री व्यवसाय बंद करण्याची मागणी घेऊन गावातील शेकडो महिला आज वणी पोलीस स्टेशनवर धडकल्या. श्री गुरुदेव सेना व बचत गटाच्या संतप्त महिलांनी एसडीपीओ संजय पूज्जलवार याना निवेदन देऊन तात्काळ कायम स्वरूपी दारू बंदीची मागणी केली.

मागील काही महिन्यापासून गावातील काही गुंड प्रवृतीच्या लोकांनी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. गावातच दारू मिळत असल्यामुळे दारू पिऊन महिलांवर अत्याचार वाढत होते. सिवाय शाळकरी मुले देखील व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांना रस्त्याने जाणे येणे देखील कठीण झाले आहे.

मूर्धोनी गावात अवैध दारु विक्रीमुळे महिलामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून श्री गुरुदेव सेनेचे तालुका संघटक भारत कारडे, महिला संघटिका प्रिया फालके, ग्रा. पं. सदस्य, पंढरीनाथ राजूरकर, प्रकाश धुळे, पूजा आंदे, माजी सरपंच पंढरीनाथ आवारी, व्यसनमुक्ती सदस्य, राहुल धुळे, श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रमुख बेबीताई कारडे यांचे नेतृत्वात सुमारे ५० ते ६० महिला व पुरुषांनी पोलीस स्टेशनवर धडक देऊन दारु बंद करण्याची मागणी केली. यावेळी श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर हे उपस्थित होते.

निवेदन देताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे यांचे नेतृत्वात तात्काळ एक पथक तयार करून मूर्धोनी गावात पाठविण्यात आले.

अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे उत्पादन शुल्क विभाग वणीत कार्यरत आहे. मात्र या कार्यालयाला नेहमीच कुलूप लावून दिसतात. वरिष्ठांनी तात्काळ दखल घेण्याची मागणी श्री गुरुदेव सेनेच्या महिलांनी केली आहे.

हे देखील वाचा:

रवीनगरमध्ये मंगळवारी रात्री चोरट्यांचा धुमाकुळ

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.