आदिवासी कोलाम पोडावर जागतिक महिला दिनाचे आयोजन

मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे उपक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: कोलाम पोडावर वास्तव्य करणाऱ्या आदिवासी महिलांचे भाषिक सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबन व्हावे. या हेतूने दि.8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी बहुल झरी जामणी तालुक्यातील आदिवासी बहुल सूर्ला येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्था, ढाणकी ता. उमरखेड, आणि ग्रामपंचायत सूर्ला ता. झरी जामणी, शाळा व्यवस्थापन समिती सूर्ला व महिला बचत गट यांच्यावतीने संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आदिवासी महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आपले हक्क व कर्तव्याची जाणीव करून देणे, त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळणे, त्यांच्या भाषिक क्षमतेचा विकास घडवून त्यांना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी व सक्षम करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

झरी जामनी तालुक्यातील अतिदुर्गम व अतिमागास असलेले सालईपोड, चिचपोड, उमरघाट, अनंतपुर, सुर्ला कोलाम पोड येथील आदिवासी गोंड ,कोलाम समाजातील शेकडो महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या.या वेळी मराठी भाषा संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पेंढरवाड व शिक्षणतज्ञ सुषमा दुधगवळी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, संगीत खुर्ची,इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सूर्ला ग्रामपंचायत सरपंच उषा कुडमेथे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मिना कनाके, आशा सेविका सरिता सराटे, वनिता देठे, सुवर्णा धानोरकर, शुभांगी सराटे, ग्रा.पं. सदस्या पुष्पा आत्राम, कविता कोडापे, मंगला सुरपाम व मोठ्या संख्येने आदिवासी महिला भगिनी उपस्थित होत्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.