झाडाची फांदी अंगावर कोसळून मजुर जागीच ठार

शिरपूर पो.स्टे. हद्दीतील नायगाव येथील घटना

जितेंद्र कोठारी, वणी : झाड तोडताना झाडाची फांदी अंगावर कोसळून रोजंदारी मजुराचा जागीच मुत्यू झाला. शनिवारी 7 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुमारास नायगाव शिवारात ही घटना घडली. जगन्नाथ किसन जीवणे (65) रा. नायगाव असे मृत इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार जगन्नाथ जीवणे हा नायगाव येथील बुधाजी सखाराम पिंपळकर यांच्या शेतात लिंबाच्या झाडाच्या फांद्या तोडण्याकरिता रोजमजुरीने गेला होता. दिवस भर काम करून तसेच वाढत्या उन्हामुळे त्याला तहान लागली. त्यामुळे झाडाची एक मोठी फांदी अर्धवट कापून तो झाडाखाली उतरला. झाडाच्या सावलीत बसून पाणी पीत असताना अर्धवट तोडलेली फांदी जगन्नाथच्या अंगावर कोसळली. यात त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने तो जागीच ठार झाला.

शिरपूर पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. फिर्यादी हर्षवर्धन रविकांत पिंपळकर रा. नायगाव यांच्या फिर्यादवरून शिरपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Comments are closed.