सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून हुतात्म्यांना अभिवादन व रूग्णांना मदत करण्यासाठी माँ आरोग्य सेवा समिती व केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन, यवतमाळच्या वतीने उद्या 1 मे रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मातोश्री प्रतिक्षालय येथे दुपारी 3 वाजता महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केमिस्ट व ड्रगिस्ट असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष पंकज नानवाणी, सचिव संजय बोरले, शहर अध्यक्ष श्रीकांत खडतकर, सचिव प्रसाद चौधरी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ना. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात रूग्णसेवेसाठी कार्यरत असलेल्या माँ आरोग्य सेवा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महारक्तदान शिबीर घेण्यात येते. शिबिरात विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, पोलीस, महसूल विभागासह अन्य शासकीय कर्मचारी, औषध विक्रेते, खेळाडू यांच्यासह तरूण, तरूणी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना याप्रसंगी प्रमाणपत्र व विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. गरजुंना रक्त मिळावे या सामाजिक जाणिवेतून या महारक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.