अखेर लिखीत आश्वासनानंतर वेडदवासियांचे उपोषण मागे
ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारा विरोधात सुरू होतं उपोषण
रफीक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यातील वेडदच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारा विरोधात एल्गार पुकारला होता. गुरुवारपासून इथले रहिवासी झरी पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसले होते. अखेर चौथ्या दिवसी रविवारी संध्याकाळी पाच वाजता पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी चव्हाण व दुय्यम गटविकास अधिकारी शिवाजी गवई यांनी उपोषणकर्त्यांना लिखीत आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. लिंबू पाणी पाजून हे उपोषण मागे घेण्यात आलं.
तीन वर्षांपासून ग्रामपंचायतीचा ग्राम विकास निधी हा स्वःविकासासाठी वापरण्यात येत असून शासनाची व ग्रामवासीयांची दिशाभूल केल्याचा आरोप तेथील ग्रामस्थ करीत आहे. यापूर्वी अनेकदा शासनाकडे याबाबत चौकशी व्हावी यासाठी तक्रार देण्यात आली होती. पण कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. अखेर गुरुवारी नाईलाजाने तेथील ग्रामस्थांनी उपोषणाचं पाऊल उचललं होतं. उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावत होती. अखेर चौथ्या दिवसी सरकारी सुट्टीच्या दिवशी रविवारी संध्याकाळी पाच वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल घेवून १५ दिवसांत ग्रामपंचायतच्या विकास कामातील झालेल्या अफरातफरीची चौकशी करुन त्याचा अहवाल उपोषणकर्त्याना देण्यात येइल असे लिखीत आश्वासन लिहुन दिले.
वेडद येथील भीमराव रामजी सोयम (मा. सैनिक), हरिभाऊ मारोती सुरपम, राजू छगन टोंगे, संजय तानबाजी बोरकर, रमेश तुकाराम चंदनखेडे, संतोष विठ्ठल जगताप, संदीप किसन मेश्राम, प्रदीप लटारी निखाडे, पांडुरंग जंबू काटवले व इतर उपोषण कर्त्यांना तहसीलदार राऊत, गटविकास अधिकारी चव्हाण, बीडीओ शिवाजी गवई, ठाणेदार शिवाजी लष्करे, सेना उप प्रमुख संतोष माहुरे, माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकाश मॅकलवार, रामलु आइटवार, अनिल पावडे यांनी उपोषण मंडपात लिंबू पाणी पाजलं. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं.