मारेगावात शिवसैनिकांनी जाळला येदुरप्पाचा पुतळा
पुतळा हटवल्याने शिवसैनिक संतप्त, भरपावसात आंदोलन
नागेश रायपुरे, मारेगाव: बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी मारेगावात कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुरप्पा यांचा पुतळा जाळून निषेध केला. रविवारी दुपारी शिवेसेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला. हे आंदोलन शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा पं.स. उपसभापती संजय आवारी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
कर्नाटक सरकारने मनगुत्ती या गावात असलेला छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात हटवला होता. ही बातमी समोर येताच राज्यभरात याचे पडसाद उमटले. मारेगावातही संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून कर्नाटक सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री येदुरप्पा यांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त केला.
यावेळी शहर प्रमुख अभय चौधरी, नगराध्यक्षा रेखा मडावी, राजू मोरे, सुरेश पारखी, राजू ठेंगणे, इंदुताई किन्हेकर, सुनीता मस्की, सुभाष बदकी, तुळशीराम मस्की, गोविंदा निखाडे, मयूर ठाकरे, श्रीकांत सांबजवार, गणेश आसुटकर यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.