बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील एका तरुणीने पाटाळ्याच्या पुलावरून उडी घेतली. शुक्रवारी दुपारीच्या सुमारास ही घटना घडली. माधूरी अरुण खैरे (28) असे नदीपात्रात उडी घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. पुलावरून प्रवास करणा-या काही प्रवाशांना पुलावर पर्स, चप्पल, मोबाईल या वस्तू आढळल्या होत्या. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आज सकाळपासून शोधमोहीमेला सुरुवात होणार आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहिती नुसार, माधुरी अरुण खैरे (28) ही मारेगाव येथील वार्ड क्रमांक 5 येथील रहिवासी आहे. तिच्या वडिलांचे 10 वर्षांआधी निधन झाले तर आईचे मार्च महिन्यात निधन झाले होते. आईवडिलांचे छत्र हरवल्याने ती व तिचा मोठा भाऊ दोघेच घरी राहायचे. तिने फार्मसीची डिग्री केली आहे. शुक्रवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी ती भावाला वणी येथे कॉलेजच्या कामासाठी जाते सांगून घरून निघाली. वणी येथे पोहोचल्यानंतर ती वरोरा येथे जाणा-या ऑटोत बसली. ऑटो पाटाळ्याच्या पुलावर आल्यावर तिने ऑटोला थांबवले व ती ऑटोतून उतरली.
फोटो काढण्याचे दिले कारण
पुलावर एकटी तरुणी उतरल्याने ऑटोचालकाला संशय आला. त्याने माधुरीला पुलावर उतरण्याचे कारण देखील विचारले. मात्र या ठिकाणी फोटो काढायला उतरली आहे व काही वेळाने इथे नातेवाईक येणार असल्याचे सांगितले. महिला असल्याने ऑटोचालक जास्त विचारपूस न करता वरो-याच्या दिशेने प्रवासी घेऊन निघून गेला.
दुपारच्या सुमारास काही प्रवाशांना पुलावर पर्स, चप्पल, मोबाईल आढळले. याच वेळी माजरी येथील एक रहिवासी असलेले दाम्पत्य या मार्गावरून जात होते. ते फोटो काढण्यासाठी पुलावर थांबले होते. दरम्यान माधुरीच्या मोबाईलवर कॉल आला. त्यांनी कॉल उचलून पाटाळ्याच्या पुलावर या वस्तू संशयास्पदरित्या आढळल्याची माहिती दिली. माधुरीच्या भावाला ही माहिती मिळताच त्याने नातेवाईकांसह तातडीने घटनास्थळ गाठले. येथील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सीसीटीव्हीत माधुरी पुलावरून उडी मारताना दिसली.
माधुरीच्या भावाने वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली आहे. रात्री उशिर झाल्याने शोधमोहीम सुरु झाली नव्हती. आज सकाळी शोध मोहीमेला सुरुवात होणार आहे. माधुरीने आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
आई, वडील दोघांचाही मृत्यू
माधुरीचे वडील अरुण खैरे व आई उषा हे दोघेही शिक्षकी पेशात होते. 10 वर्षा पूर्वी तिच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले होते. तर सहा महिन्याआधी माधुरीची आई घरातील केरकचरा जाळत होती. दरम्यान कपड्याने पेट घेतल्याने ती भाजली होती. दीड महिन्यानंतर त्यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आई गेल्यानंतर माधुरी ही एकाकी झाली होती.
Comments are closed.