तालुका प्रतिनिधी, वणी: वणीच्या एका बेरोजगार युवकाला नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत त्याची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सदर बेरोजगार युवकाने संबंधित संस्थासचिव आणि मध्यस्थावर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे केली आहे.
वणी येथील आशिष बंडू इखारे असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. वणीच्या एका माजी नगराध्यक्ष यांच्या शिफारशीने राळेगाव येथील निवासी मूकबधिर विद्यालयात कामाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. असा आरोप वामन इखारे यांनी केला आहे. दरम्यान आशिषला 27 जून 2017 ला राळेगाव येथील निवासी मूकबधिर विद्यालयात कामाठी पदाचा नियुक्ती आदेश दिला. त्याअनुषंगाने आशिष हा 1 जुलै पासून कामावर रुजू झाला.
त्याकरिता सदर संस्थेचे सचिव पुरुषोत्तम रामाजी भस्मे यांच्याकडे आशिष इखारे यांचे काका वामन झित्रुजी इखारे यांनी दि. 10 जुलै 2017 रोजी रोख पाच लाख 50 हजार रुपये दिले. त्यानंतर सचिवांनी पद मंजुरीसाठी 25 हजार रुपये घेतले. असे एकूण पाच लाख 75 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. आशिष इखारे यांनी सलग सव्वादोन वर्षं विनावेतन संस्थेत काम केले. मात्र सदर संस्थेत कामाठी पदाला मान्यताच नसल्याने इखारे यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. परिणामी सदर युवक 1 डिसेंबर 2019 ला नोकरी सोडून घरी परत आला.
नोकरी न मिळाल्याने माजी नगराध्यक्ष आणि संस्थासचिव पुरुषोत्तम भस्मे यांच्याकडे दिलेली रक्कम परत मागितली. त्यावेळी सचिवांनी वामन इखारे यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा धनादेश (क्रमांक 151002) दिला. सदर धनादेश जमा करण्यास टाकला असता संबंधित खात्यात रक्कम जमा नसल्याने धनादेश 27 मार्च 2020 ला परत आला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वामन इखारे यांनी फसवणूक करणारे संस्थासचिव आणि मध्यस्थी असलेल्या माजी नगराध्यक्ष यांच्यावर कार्यवाही करून बेरोजगार युवकाला न्याय मिळवून देण्याची मागणी आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तक्रारिद्वारे केली आहे. संबंधित तक्रारीची प्रत उपआयुक्त समाजकल्याण विभाग, पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत.