बेरोजगारीच्या प्रश्नावर मुकुटबन परिसरातील तरुण एकवटले
स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याने तरुण आक्रमक, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
सुशील ओझा, झरी: परिसरातील कंपनीमध्ये रोजगार दिला जात नसल्याने स्थानिक बेरोजगार तरुणांनी एकत्र येत परिसराती कंपनी व प्रशासनाला निवेदन दिले. विशेष म्हणजे परिसरातील विविध खेडेगावातील हे बेरोजगार तरुण व्हाट्सउप आणि फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आले. मुकुटबन येथील बी. एस. इस्पात कोळसा खाण, आरसीसीपील सिमेंट कंपनीसह इतर कंपनीत 80 टक्के स्थानिकांना रोजगार द्यावा अशी मागणी बेरोजगार तरुणांनी केली. जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आमरण उपोषण करणार असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
तालुक्यातील मुकुटबन, भेंडाळा, मार्की, अर्धवन, पांढरकवडा (ल), रुईकोट, अडेगाव, पिंपरड तसेच इतर काही गावात कोळसा खाण, डोलोमाईन्स, सिमेंट कंपनी इत्यादी उद्योग आहेत. अधिकाधिक स्थानिकांना रोजगार द्यावा अशी गाईडलाईन असतानाही कामगार अकुशल आहे. त्यांच्याकडे डिग्री नाही असे सांगून त्यांना नोकरी नाकारली जात आहे व परप्रांतियांना नोकरी दिली जात असल्याचा आरोप बेरोजगार तरुणांचा आहे.
लोकप्रतिनिधी, स्वयंघोषीत नेते-समाजसेवक उदासिन
स्थानिक बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर याआधीही उत्स्फुर्तपणे आंदोलने केली आहे. मात्र त्यांना अद्यापही कोणत्याही स्थानिक पुढारी, लोकप्रतिनिधी किंवा स्वयंघोषीत समाजसेवकांचा पाठिंबा मिळालेला नाही. त्यांनी कायमच या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. निवडणुकीच्या वेळी रोजगाराचे आमिष दाखवून नंतर तरुणांना नेते लोक वा-यावर सोडतात असा देखील बेरोजगार तरुणांचा आरोप आहे.
सोशल मीडियातून एकवटले तरुण
परिसरात वाढती बेरोजगारीमुळे तरुण वैफल्यग्रस्त झाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. मात्र तिथे परप्रांतियांनाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे परिसरात रोजगार असतानाही अनेकांना गाव सोडून मोठ्या सिटीत जावे लागते. अखेर या प्रश्नाबाबत सोशल मीडियातून वाट मिळाली व परिसरातील सुमारे 80 ते 90 तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले.
या प्रश्नावर बेरोजगारांनी कंपनी व प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र जर मागणीकडे दुर्लक्ष केल्यास याच्या दुपटीने तरुण एकत्र येत सामुहिक उपोषणाला बसणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
हे देखील वाचा: