विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. रोज अप डाऊन करत ते शिक्षण पूर्ण करतात. मात्र मंगळवारी या विद्यार्थ्यांना वेगळ्याच प्रसंगाला सामोरं जावं लागलं. मंगळवारी बस वेळेवर न आल्याने विद्यार्थी रात्री 9.30 वाजता घरी पोहचले .महत्त्वाचे म्हणजे यामध्ये अधिकांश मुली होत्या. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावर युवासेना आक्रमक झाली असून युवासेनेतर्फे बस आगार व्यवस्थापकास निवेदन देण्यात आले.
युवा सेनेचे उपजिल्हा अधिकारी आशिष खुलसंगे यांनी व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापकास निवेदन दिले. वणी ते बोपापूर या ठिकाणाहून जवळपास 150 विद्यार्थी, वणी ते घूग्गुस या ठिकाणाहून 80 विद्यार्थी, तर वणी ते वरोरा मार्गावरून 70 ते 80 विद्यार्थी रोज ये जा करतात. यासाठी विद्यार्थ्यांच्या सोईनुसार बस आहेत. परंतु त्या वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचीत राहण्याची वेळ आली आहे. काही विद्यार्थ्यांचे तर दोन तासिका ही बुडतात.
बसेस वेळेवर न आल्याने अब्यासालाही पुरेसा वेळ मिळत नाही. अशा वेळीं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर लवकर तोडगा काढला नाही तर युवसेनेद्वारे विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन आम्ही उपोषण बसू, असा इशारा युवा सेनेद्वारे देण्यात आला आहे
वणी परिसरात अनुदानित पदवी अभ्यासक्रमासाठी एकच महाविद्यालय असल्याने आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी वणीमध्ये शिक्षण घेण्यासाठी मोठया प्रमाणात येत असतात. यापैकी काही विद्यार्थी वणीतच भाड्याने खोली करून राहतात. तर काही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे रोज ये जा करतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा वेळ व पैसे खर्च होत असून राज्य परिवहन महामंडळाकडून त्याची दखल घेतल्या जात नाही. यागोदरही निवेदन दिल्यानंतर काही दिवस सुरळीत बस येते परंतु नंतर पुन्हा तीच परिस्थिती विद्यार्थ्यांवर ओढविल्या जात आहे. असा आरोप युवासेनेतर्फे करण्यात आला आहे.