संजय लेडांगे, मुकुटबन: अतीदुर्गम व आदिवासीबहुल तालुका म्हणून झरीजामणी तालुक्याची दूरदूर ओळख आहे. सण 1992 साली झरी तालुका म्हणून जिल्ह्याच्या नकाशावर आला. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हा तालुका आजही पायाभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. यातील महत्त्वाची सेवा म्हणजे बसस्थानक. गेल्या 27 वर्षांपासून तालुक्याचे ठिकाण बसस्थानकच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानकच नसल्याने प्रवाशांचे तसचे विद्यार्थी यांचे मोठे हाल होत आहे.
झरी तालुका झाल्यापासून बसस्थानक सारख्या सोयीसुविधेकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले. झरीजामणी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय तसेच प्रशिक्षण केंद्र आहेत. यामुळे या ठिकाणी दररोज नागरिकांची कार्यालयीन कामासाठी तसेच पुरुष व महिला प्रवाशी तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने येतात. यासह शाळा, महाविद्यालयातील विध्यार्थी-विध्यार्थीनीही खेडेगावातून शिक्षणासाठी येतात.
किराणा दुकान व हॉटेल बनले प्रवाशांचा आसरा
झरीजामणी येथे हक्काचे बसस्थानक नसल्याने त्यांना एस टी बसची वाट पाहत झाड, किराणा दुकान, हॉटेल यासारख्या ठिकाणाचा नाईलाजास्तव आसरा घ्यावा लागतो. परिणामी या ठिकाणी चिडीमारीचे प्रकारही घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रश्नाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहे.