आदिवासी बांधवांची मोहफुलांसाठी जंगलाकडे धाव

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील ग्रामीण व आदिवासीवस्तीत बेड्यावर, पोडवर वसलेल्या भागात मोहफुलें वेचणी व गोळा करणे सुरू झाले आहे. दरवर्षी मार्च ते एप्रिल या महिन्यात मोह वृक्षांना बहर येऊन फुले येऊन ती गळून झाडाखाली पडत असतात. सदर फुले औषधी, मद्य व इतर अनेक उपयोगी असल्याने या फुलांची बाजारात मोठी मागणी आहे. यासाठी तालुक्यातील लहान मुलांपासून महिला, पुरुष व वृद्ध मंडळी सुद्धा भल्या पहाटे जंगलाच्या दिशेने धाव घेत आहे. जीवाची कसलीही पर्वा न करता मोहफुलें गोळा करण्यात सध्या सर्वच दंग असल्याचे दिसून येत आहे.

झरी तालुका जंगलव्याप्त विविध वंनसंपतीने नटलेला आणि खेडेगावाना जंगलाच देणं लाभलेलं आहे. अशा तालुक्यात सागवान, मोह, पळस, बाभूळ, खैर, कडुनिंब, निलगिरी, यासह विविध जातीचे वृक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिबला, माथार्जुन, मूच्ची, शेकापूर, पवनार, निमनी, दाभाडी, तेजापूर, बोपापूर, डोंगरगाव आदी गावे वनवर्तुळात आहे, सध्या मोहफुलांचा हंगाम असल्याने महिला, पुरुष तसेच घरची वृद्ध मंडळी जंगली उत्पादनाचा फायदा घेताना दिसत आहेत. हे काम कसरतीचे असून जीवाची पर्वा न करता भल्या पहाटे जंगलात भटकंती करून आपली मोलमजुरी व उदरनिर्वाहाचा प्रश्न उराशी बाळगून आदिवासी बांधव सध्या मोहफुलें गोळा करताना दिसून येत आहेत.

यादरम्यान मोहफुलाचा सडा सकाळी झाडाखाली पडलेला असतो. थोडा उशीर झाला तर जंगली प्राणी ते फस्त करतात. त्यामुळे पाण्याची बाटली घेऊन लहान व आबालवृद्ध मोहफुले वेचणीसाठी भल्या पहाटे जंगलाकडे धाव घेतात. या मोहफुलाच्या व्यवसायात पुरुषापेक्षा महिलांची संख्या अधिक दिसून येत आहेत. फुले वाळवून 30 ते 35 रुपया प्रति विकल्या जाते. यावरून आपली पोटाची खळगी भरत असते. तर गावात फिरून मोहफुले खरेदी करणारी खरेदीदार कमी किमतीत खरेदी करून मोहफुले वेचणा-यांचे एक प्रकारे आर्थिक शोषणच करत आहे.

मोहफुलावर प्रकिया करून ग्रामीण भागात दारू बनविली जाते. तर विविध आजारांवरही औषधी बनविण्यासाठी मोहफुलाचा उपयोग होतो. याबरोबर आंघोळीचे साबण तयार करण्याकरिता मोहफुलें उपयुक्त ठरतात. ग्रामीण भागात तर धार्मिक विधीसाठी मोहफुलाना अधिक महत्व असल्याचे सांगण्यात येते. इतक्या मेहनतीने हे काम केल्यानंतरही मोहफुलांना योग्य भाव मिळत नसल्याची खंत आदिवासी बांधव व्यक्त करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.