सुशील ओझा, झरी: आजच्या आधुनिक व सोशल मीडियाच्या काळात पत्रव्यवहाराला उतरती कळा लागली आहे. परंतु ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पोस्टाला किंमत आहे. यादरम्यान झरी तालुका स्तरावर लोकांच्या दैनंदिन पत्र व्यवहार करण्यासाठी जावे लागते. तालुक्यातून स्पीडपोस्ट करायचे झाल्यास वणी व पांढरकवडा या ६० ते ७० की.मी. अंतरावर पायपीट करावी लागत होती. मात्र बहुप्रतीक्षेनंतर झरी येथे पोस्ट ऑफिसचे लोकार्पण ५ मार्च ला करण्यात आले होते.
तालुक्यात पाटण , मार्की, शिबला, माथार्जून, सातपल्ली, धानोरा आणि जामनी येथे पोस्ट कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात स्पीडपोस्ट सेवा उपलब्ध नसल्याने तालुक्यातील जनतेला स्पीड पत्र व्यवहार करण्यास अडचण निर्माण होत होती. यासाठी तालुक्यातून झरीला स्पीडपोस्ट व पत्र व्यवहाराच्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी होती. बऱ्याचदा पत्र व्यवहार उशिरा मिळत असल्याने आवश्यक कागदपत्रे वेळेवर मिळत नव्हते. त्यामुळे तालुक्यात पोस्टऑफिसबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. याच अनुषंगाने झरी येथे पोस्ट कार्यालयाचे लोकार्पणही करण्यात आले. परंतु ऑनलाइन सुविधा अजूनही नसल्याने स्पीडपोस्टची सुविधा पूर्णपणे बंद आहे .ज्यामुळे जनतेला वणी, पांढरकवडा सारख्या ठिकाणी जाऊन स्पीडपोस्ट तसेच इतरही ऑनलाइन होणाऱ्या कामाकरिता जावे लागत आहे.
जनतेला स्पीड पोस्टच्या एका कामाकरिता ४०० ते ५०० रुपये खर्च लागत असल्याने जनतेत प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे . मोठा गाजावाजा करून लोकार्पण केलेले पोस्ट कार्यालय ऑनलाइन नसल्याने पांढरा हत्ती दिसत आहे. तरी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ऑनलाइन स्पीडपोस्ट ची सुरू करावी अशी मागणी होत आहे.