दाखल्यांसाठी बोगस पावती देऊन दुप्पट शुल्क आकारणी
तहसील प्रशासन, सेतू केंद्र व झेरॉक्स सेंटरची मिलीभगत
रफीक कनोजे, मुकुटबन: नागरिकांना विविध दाखले देण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘महा-ई-सेवा केंद्र’ आणि सेतू सुविधा केंद्रे सुविधा केंद्र राहिले नसून, नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारणी करून नागरिकांची लूट करण्याचे ठिकाण बनल्याचे निदर्शनास आले आहे. दाखले मिळवण्यासाठी‘एक खिडकी’च्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सेतू सुविधा केंद्र आणि महा- ई-सेवा केंद्र तहसील कार्यालयात आणि विविध ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. त्यामागे नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये घालावे लागणारे हेलपाटे कमी करण्याचा उद्देश आहे. मात्र, या केंद्रांमध्ये ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल झरी तालुका मुख्यालयात तहसील कार्यालयामध्ये सुरु असलेले सेतू सुविधा संचालिकाकडून दाखल्यासाठी दुप्पट शुल्क वसूल केल्याची घटना दि १३ डिसे. रोजी घडली असून याबाबत जिल्हाधिकारी, यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यवतमाळ, उपविभागीय अधिकारी केळापूर व तहसीलदार झरी (जामणी) यांना करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार राज्यात सेतू सुविधा केंद्र चालविण्यासाठी गुजरात इन्फोटेक लि. या कंपनीला अधिकृत करण्यात आलेले आहे. या कंपनीचे झरी येथील तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र जामणी येथील अमोल मंचलवार नावाचा व्यक्ती चालवीत असून सदर सेतू सुविधा केंद्रात विविध प्रकारचे ऑनलाईन दाखले देण्यासाठी शासनाने ठरविलेले दरापेक्षा दुप्पट शुल्क आकारणी केली जात आहे.
बुधवार दि. १३ डिसे. रोजी वणी येथील जितेंद्र कोठारी हे आपले राशन कार्ड रद्द करण्यासाठी झरी तहसील कार्यालयात गेले असता तहसील कार्यालयातील सेतू केंद्राची महिला संचालिका यांनी सुविधा शुल्क म्हणून ८० रुपये घेऊन त्यांना ऑनलाईन पावतीच्या ऐवजी साधी छापील पावती हातात दिली. त्या पावतीवर घेण्यात आलेल्या शुल्काची रक्कमसुद्धा त्या संचालीकानी टाकली नव्हती. याबाबत झरीचे तहसीलदार गणेश राउत यांना पावती दाखवून राशन कार्ड रद्द करण्याचा शासकीय शुल्क किती आहे असे विचारले असता त्यांनी सदर महिला संचालिकेला आपल्या केबिनमध्ये पाचारण करून विचारणा केली. तेव्हा तिने सांगितले कि शासकीय शुल्क दर ३३.६० पैसे आहे.
सेतू केंद्र संचालिकानी आपली फसवणूक करून दुप्पटपेक्षा अधिक रक्कम उकळल्याचे लक्षात येताच कोठारी यांनी त्या पावतीची फोटो काढून जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे ट्विटर हॅंडल @CollectorYavatm वर ट्विट करून सेतू केंद्राकडून नागरिकांची लुट होत असल्याची माहिती दिली. झरी तहसील कार्यालयातून दाखले मिळविणारे सर्व नागरिकांना ऑनलाईन पावतीच्या जागी छापील पावती देऊन नागरिकांची लुट व शासनाची फसवणूक केली जात आहे.
सेतू केंद्रात अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या बाहेर असलेले झेरॉक्स दुकानातून अर्जचे सेट आणल्यासाठी नागरिकांना सांगितले जाते परंतु झेरॉक्स दुकानदार सुद्धा पाच पानाचे अर्जाचे एका सेटचे २० ते ३० रुपये घेऊन तालुक्यातील गोर गरीब व अशिक्षित आदिवासी नागरिकांना लुटण्याचे काम करीत आहे. झरी तहसील कार्यालयातील सेतू केंद्राची पूर्वीही अनेकदा तक्रार तहसील प्रशासनाकडे नागरिकांनी केली आहे मात्र तहसील कार्यालयातील कर्मचारी, सेतूकेंद्र व झेरॉक्स दुकानदारांचे साटेलोटे असल्यामुळे कोणावरही कारवाई केली जात नाही.
याबाबत जितेंद्र कोठारी यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यवतमाळ, उपविभागीय अधिकारी केळापूर व तहसीलदार झरी यांना एक तक्रार देऊन नागरिकांना लुटणाऱ्या झरी तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
याबाबत वणी बहुगुणीजवळ तहसीलदारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तहसील कार्यालयातील सेतू सेतू सुविधा केंद्र संचालक दाखल्यासाठी अधिक शुल्क घेत असल्याची अनेक तक्रारी मला मिळाली आहे. याबाबत सेतू संचालकांना नोटीस पाठविण्यात आले आहे. तक्रारीची चौकशी करून सदर सेतू सुविधा केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. – गणेश राउत ( तहसीलदार- झरी )