झेड.पी. शाळेचा विद्यार्थी जेव्हा ‘असं’ नेत्रदीपक यश मिळवतो…..

खुशाल झोटिंग यांचा जीएसटी निरीक्षक झाल्याबद्दल खैरे कुणबी समाजाकडून गौरव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांकडे एका वेगळ्या अँगलनं पाहिलं जातं. त्यांच्या अफाट क्षमतांवर संशय व्यक्त होतो. मात्र चिकाटी, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर यश कसं खेचून आणावं? हे झेडपी शाळेपासून शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या आणि उत्तुंग यश मिळवणाऱ्या खुशालनं दाखवून दिलं. खुशाल झोटिंग हा एम.पी.एस.सी. परीक्षेतून जीएसटी निरीक्षक म्हणून यशस्वी झाला. त्याबद्दल त्याचा खैरे कुणबी समाज संघटनेने विठ्ठलवाडी येथे सत्कार केला.

मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ हे खुशालच गाव. त्यांचे वडील अनिल झोटिंग यांच्याकडे जेमतेम पाच एकर शेती. त्यात एक मोठा परिवार सांभाळणं म्हणजे कसरतच. मात्र एवढं असलं तरीही अनिल झोटिंग यांनी मुलांवर शिक्षण आणि संस्कार कमी पडू दिले नाहीत. त्यांच्या परिवारातील पाच सदस्य हे पदवीधर आहेत हे विशेष. अतिशय कठीण आणि विपरित परिस्थितीत खुशालने एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अनेकदा अपयशांचा सामना केला. मात्र त्याचा संपूर्ण परिवार खंबीरपणे त्याच्या पाठीशी आजही उभा आहे. विशेषतः त्याचा भाऊ. खुशालने पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण चिंचमंडळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत घेतले. आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मारेगाव आणि वणी येथे झाले. त्याने शिक्षणाचा ध्यास कायम ठेवला. पुढे यवतमाळ येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून त्याने बीएससी ऍग्री यशस्वीरित्या पूर्ण केलं.

यादरम्यान 2023 मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीची एमपीएससीची जाहिरात निघाली. रक्ताचं पाणी करून कित्येक तास तो अभ्यासाला लागला. अखेर त्याच्या परिश्रमाचा फळ मिळालं. खुशाल आता जीएसटी निरीक्षक म्हणून शासकीय सेवेत दाखल झाला. त्याच्या या यशाबद्दल खैरे कुणबी समाज संघटनेनं नारायण मांडवकर यांच्या घरी विठ्ठलवाडीत खुशालचा सत्कार केला., यावेळी दिवाकर नरुले, गणेश लाकडे, रामदास भोयर, भास्कर सोमलकर, बाबाराव राऊत, नारायण मांडवकर, परशुराम पोटे आणि समाजातील माता भगिनी उपस्थित होत्या.

Comments are closed.