वहिनीनेच केला आपल्या दिराविरुद्ध संपत्ती हडपल्याचा आरोप

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सलाट परिवारातील मृतक रशीद सलाट यांच्या पत्नीने तिच्याच सख्या दिराने खोटे दस्तऐवज बनवून संपत्ती हडप केल्याच्या आरोप केला आहे. याबाबतची तक्रार पीडित फरजाना हिने उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे निवेदनातून दिली. त्याचप्रमाणे सोमवारी 6 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत झालेल्या फसवणुकीची माहिती दिली.

सविस्तर वृत्त असे की, हारून नूर मोहमद सलाट यांना चार मुले व एक मुलगी. हारून यांच्या मृत्यू नंतर संपूर्ण संपत्ती त्यांच्या वारसांमध्ये वाटण्यात आली. त्यानंतर रशीद यांचा 22 नोव्हेंबर 1997 मध्ये चंद्रपूर वणी रोडवर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी फरजाना व चिमुकली इफ्तशाम जि केवळ 7 महिन्याची होती. त्यावेळी या दोघीही मायलेकींना घरातून हाकलून लावण्यात आले. त्यावेळी फरजाना हिने आपल्या माहेरी जाऊन मुलीचे पालनपोषण केले. कधीकधी फरजाना ही सासरी येत होती.

सन 2012 मध्ये रशीदचे भाऊ अल्ताफ यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अल्ताफच्या पत्नी डॉ यास्मिन यांना माहीत होते की, फरजाना हिच्यावर अन्याय झाला आहे. कारण फरजाना ही अशिक्षित असल्याने तिच्या पतीच्या नावावर कुठे व किती संपत्ती होती याची माहिती नव्हती.  यास्मिन हिने पतीच्या मृत्यूनंतर फरजाना व तिच्या मुलीला मदत करण्याचे ठरविले. मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. परंतु पुरुषप्रधान व्यवस्थेने तिला तिचा दीर अस्लम व नणंद फरिदा यांनी यश मिळू दिले नाही.

त्यानंतर रशीद यांच्या नावे जी संपत्ती होती तिही अस्लम याने बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केली असल्याची माहिती आली. ज्यामध्ये चिखलगाव व वडगाव (धानंदीर) येथील शेती ही मंडळ अधिकारी पुनवट व नायब तहसीलदार वणी यांच्याशी संगनमत करून खोटे वारसाचा दाखला व शपथपत्र जोडून रशीद हे जिवंत असतानाच खोट्या कागदपत्रांच्या साहाय्याने संपत्ती हडप केली आहे. याची माहिती 6 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.