वणी-वरोरा मार्ग बंद, पाटाळ्याचा पूल पाण्याखाली

कंटेनर नेणारे वाहन व ट्रक फसल्याने चारगाव-कोरपना वाहतूक विस्कळीत, पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा

जितेंद्र कोठारी, वणी: संततधार पावसामुळे बेंबळा प्रकल्प नवरगाव, अप्पर वर्धा व लोअर वर्धा इ. धरणाचे पाणी पूर्ण भरल्याने नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे वणी तालुक्यासह झरी आणि मारेगाव तालुक्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर धरणाचे पाणी सोडल्याने पाटाळ्याचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दुपारी 1 वाजेपासून वणी-वरोरा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर शिरपूरजवळ कंटेनर उलटल्याने शिरपूर ते कोरपना वाहतूक बंद झाली आहे. 

लोअर वर्धा धरणातून दुपारी 2 वाजता पासून 2625 घनमीटर प्रति सेकंद तर बेंबळा प्रकल्पातून 1 वाजता पासून 1450 घनमीटर प्रति सेकंड प्रमाणे पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी परिसरात असलेल्या सर्वच नदी व नाल्याच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास पाटाळा येथील पुलाला पुराच्या पाण्याने स्पर्श केला. त्यानंतर काही वेळातच पाणी पातळीने पुलाला आपल्या कवेत घेतले. सध्या 1 वाजेपासून पूल पाण्याखाली असून वणी – वरोरा मार्ग बंद झाला आहे.

चारगाव ते कोरपना वाहतूक विस्कळीत
शिरपूर जवळील वारगाव फाट्याजवळ कंटेनर घेऊन जाणारे वाहन व कोळसा घेऊन जाणारा ट्रक फसल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कंटेनर घेऊन जाणारे वाहन खड्यात गेल्याने वाहनावरील मशिन घसरली. दरम्यान कोळसा घेऊन जाणा-या एका ट्रकने वाहन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकही खड्ड्यात फसला. दोन्ही वाहने फसल्याने शिरपूर ते चारगाव वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या या मार्गावरून फक्त दुचाकीची वाहतूक सुरू आहे. आज वाहनावरील मशिन हटवणे शक्य नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक उद्या मंगळवार पर्यंत विस्कळीत राहू शकते. 

नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वणी आणि परिसरातीत जे गाव नदी शेजारी आहेत त्या गावातील नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. तसेच पुराच्या पाण्यात सेल्फी काढू नये, पुलावरून पाणी असल्यास वाहने काढू नये, मोडकळीस आलेल्या घरात आश्रय घेऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आपातकालीन काळात 07239225062 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: 

जि. प. शाळेला विकृत रूप देण्याचा प्रयत्न, गावकरी संतप्त

शिवसेना शहरप्रमुखपदी सुधीर थेरे यांची नियुक्ती

दीप्ती टॉकीजचे संचालक दीपक ठाकूरवार यांचे निधन

Comments are closed.