मजुरांना चिरडणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात

मुंगोली चेकपोस्टवरून शिरपूर पोलिसांनी ट्रक घेतला ताब्यात दोन गंभीर जखमी मजुरांवर चंद्रपूर येथे उपचार सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्घुस महामार्गावर पुनवट गावाजवळ रस्त्याची डागडुजी करणाऱ्या 5 मजुरांना चिरडून ट्रक चालक पसार झाला होता. या अपघातात 2 मजुरांचा मृत्यू तर दोन मजूर गंभीर जखमी झाले होते. तर एक मजूर किरकोळ जखमी झाला होता. अपघात झाल्यानंतर शिरपूर पोलिसांनी अवघ्या दोन तासात ट्रक जप्त केला आहे. कोळशाची वाहतूक करणारा आरआयपीएल कम्पनीचा ट्रक (MH31 FC6399) पोलिसांनी मुंगोली चेकपोस्ट येथून ताब्यात घेतला. या भीषण दुर्घटनेत राजू मिलमिले (27) रा. कोठोडा (ता. पांढरकवडा) व धर्माजी भटवलकर (65) रा. बेलोरा हे दोन मजूर जागीच ठार झाले. तर सतीश गेडाम, सुरेश जूनघरी (दोघेही राहणार बेलोरा) व पांडुरंग अवताडे (रा, काठोडा) असे 3 मजूर जखमी झाले होते. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

बुधवारी दिनांक 5 मे रोजी वणी-घुग्घुस रोडवरील पुनवट (पुरड) गावाजवळ काही मजूर रस्त्याच्या डागडुजीचे काम करीत होते. 4.30 वाजताच्या सुमारास आरआयपीएल कम्पनीचा ट्रक (MH31 FC6399) भरधाव घुग्घुसच्या दिशेने जात होता. पुनवट गावाजवळ ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले व ट्रकने बोलेरो पिकअपला जबर धडक दिली. या पिकअप गाडीच्या समोर ट्रॅक्टर उभे होते. ट्रकच्या धडकेमुळे पिकअप ट्रॅक्टरवर धडकले व ट्रॅक्टर थेट मजुरांच्या अंगावर गेले.

या भीषण दुर्घटनेत राजू मिलमिले (27) रा. कोठोडा व धर्माजी भटवलकर (65) रा. बेलोरा हे दोन मजूर जागीच चिरडून ठार झाले. 3 मजूर जखमी झाले. ट्रकने धडक दिल्याचा आवाज येताच बसस्थानक जवळ उभे असलेल्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यत ट्रक चालकाने गाडी रिव्हर्स घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान घटनास्थळावरील लोकांनी धडक देणा-या ट्रकचा नंबर नोट करून ठेवला.

दोन गंभीर जखमी मजुरांना उपचारासाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. घटनेची माहिती तात्काळ शिरपूर पोलीस स्टेशनला देण्यात आली.

प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी तात्काळ सूत्रे हलवली. परिसरातील चेकपोस्टला याची माहिती देण्यात याली. अपघातानंतर अवघ्या दोन तासांच्या आत मुंगोली चेकपोस्ट चिरडणारा ट्रक ताब्यात घेण्यात आला. शिरपूर पोलिसांनी निष्काळजीपणाने ट्रक चालवून 2 निष्पाप मजुरांचा जीव घेणाऱ्या ट्रक चालकाला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

वणीत प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

पत्नी व तिच्या मोठ्या बहिणीला हॉकी स्टिकने मारहाण

ब्रेकिंग न्युज – मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांना अटक

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.