रस्त्यावर डागडुजी करणा-या मजुरांना ट्रकची धडक, दोघे जागीच ठार

पुनवट बसस्थानक समोर विचित्र अपघात, ट्रकची पिकअप व ट्रॅक्टरला धडक... तीन मजूर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या पुनवट बसस्थानकासमोर एका भरधाव ट्रकने डिव्हायडर जवळ उभे असलेल्या पिकअप व ट्रॅक्टरला जबर धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरखाली दोन मजूर चिरडून जागीच ठार झाले. तर तीन मजूर जखमी आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून एक किरकोळ जखमी आहे. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. 

पुनवट (पुरड) बसस्थानकासमोर आज दुपारी काही मजूर ट्रॅक्टर व पिकअप हे दोन वाहने सोबत घेऊन रस्त्याच्या डागडुजीचे काम करीत होते. 4.30 वाजताच्या सुमारास वणीच्या दिशेहून एक भरधाव हायवा ट्रक आला. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने आणि पिकअपला जबर धडक दिली. पिकअपच्या समोर ट्रॅक्टर उभे होते. ट्रकच्या धडकेमुळे पिकअप ट्रॅक्टरवर धडकले व ट्रॅक्टर थेट मजुरांच्या अंगावर गेले. या अपघातात ट्रॅक्टरखाली दोन मजूर चिरडले गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर व एक किरकोळ जखमी झाला.

ट्रकने धडक दिल्याचा आवाज येताच बसस्थानक जवळ उभे असलेल्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यत ट्रक चालकाने गाडी रिव्हर्स घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. दोन गंभीर जखमी मजुरांना उपचारासाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेची माहिती शिरपूर पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे. अद्याप मृत मजुरांचे नाव कळू शकले नाही. 

हे देखील वाचा:

ब्रेकिंग न्युज – मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांना अटक

राजू उंबरकर वणी पोलिसांच्या नजरकैदेत..!

Comments are closed.