भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

ड्युटीवरून परतणा-या तरुणावर काळाचा घाला, राजूर रिंगरोडवरील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: ड्युटीवरून दुचाकीने परत येणा-या एका तरुणाला राजूर रिंग रोडवर एका भरधाव ट्रकने चिरडले. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विपीन खंडाळकर (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी दिनांक 16 जुलै रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

सविस्तर वृत्त असे की विपीन खंडाळकर (30) हा तरुण निंबाळा येथील रहिवाशी होता. तो महावीर मिनरल्स या कोल वॉशरीमध्ये कामाला होता. रात्री तो ड्युटी संपून आपल्या गावी निबाळा येथे परतत होता. दरम्यान रात्री 9.30 वाजताच्या सुमारास रिंगरोडजवळ यवतमाळच्या दिशेकडून येणा-या एका भरधाव ट्रकने विपीनच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की विपीन जागीच ठार झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोक घटनास्थळी गोळा झाले. काहींनी गावातील लोकांना याची माहिती दिली. अपघातामुळे गावकरी चांगलेच संतप्त झाले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

सदर घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. विपीनचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेचा वणी पोलीस तपास करीत आहे.

हे देखील वाचा: 

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

 

Comments are closed.