वणी उपविभागात पुराचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत

अनेक गावात घुसले पुराचे पाणी, शेतीचे प्रचंड नुकसान.. रांगणा येथील तरुणाला सर्पदंश, बोटीतून काढले बाहेर, अखेर वणी-घुग्गुस मार्गही बंद

जितेंद्र कोठारी, वणी: संपूर्ण वणी उपविभागात पुराने हाहाकार उडाला आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पाण्याने वेढा घातला आहे. वणीच्या उत्तरेकडील शेलू (खुर्द), भुरकी, कोना, झोला, पूर्वेकडील उकणी, जुनाड, पिंपळगाव तर दक्षिणेकडील सावंगी, चिंचोली, जुगाद, कवडशी या गावाला पुराचा मोठा फटका बसला असून हे गाव पाण्याखाली आले आहे. पुरामध्ये तालुक्यातील शेकडो लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. पुरामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याने शेतात बांधलेले काही जनावरे व शेतीपयोगी अवजारे वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान पूरग्रस्त गावातील लोकांना प्रशासनाद्वारे रेस्क्यू करणे सुरू आहे. पाटाळ्याचा पुल पाण्याखाली आल्याने वणी-वरोरा वाहतूक बंद असून सध्या घुग्गुस मार्गे वाहतूक सुरू आहे. मात्र नायगाव जवळील सखल भागात पाणी साचत असल्याने व रस्त्याचे नुकसान झाल्याने वणी-घुग्गुस मार्गही बंद करण्यात आला आहे. दरम्यान पुरामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कोना गावात शिरले पुराचे पाणी

अप्पर वर्धा, व बेंबळा धरणाचे दरवाजे उघडल्याने परिसरातील वर्धा, पैनगंगा, निर्गुडा नदीला पूर आला आहे. वर्धा नदीच्या तिरावर असलेल्या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. वणीच्या उत्तर भागात वर्धा नदीकाठी असलेल्या शेलू (खुर्द), भुरकी हे गावांसह शिवणी (धोबे), वनोजा गावांना चांगलाच फटका बसला आहे. तर रांगणा, नांदेपेरा या गावाचा काही भाग पाण्याखाली आला आहे. कोना आणि झोला गाव हे संपूर्ण गाव पाण्याखाली आले आहे. तर सावर्ला गावाच्या एका बाजूला एक किमी अंतरापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. पुरामुळे पाटाळा येथील पुलावरून तब्बल 10 फिट पाणी वाहत आहे. या मार्गावर नवीन तयार करण्यात येणारा पूल देखील पाण्याखाली आला आहे. सध्या झोला येथील पुलापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. दरम्यान बचाव पथकाने कोना व झोला या गावातील लोकांना सावर्ला व वणी येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे. सध्या या मार्गावर पोलीस विभागाचे कर्मचारी व बचाव पथक उपस्थित आहे. 

शेलू गावाला पुराचा मोठा फटका

वणीच्या पूर्व भागाकडे असलेल्या उकणी, जुनाड, पिंपळगाव हे गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. संपूर्ण जुनाड गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. तर उकणी गावातील नदीच्या काठावरील भाग पाण्याखाली गेला आहे. पिंपळगाव हे अर्धे बुडाले आहे. बोरगाव पासून उकणीकडे जाणा-या रस्त्यावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. सध्या रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकीची वाहतूक बंद झाली आहे. वणीच्या दक्षिण भागात असलेल्या सावंगी, चिंचोली, जुगाद, कवडशी या गावालाही पुराचा फटका बसला असून या गावातील ही शेकडो घरे पाण्याखाली आली आहे.

उकणी गावातील पूर परिस्थिती
कवडशी गावात शिरले पाणी

रांगणा येथील तरुणाला सर्पदंश, बोटीतून काढले बाहेर
रांगणा येथील शंकर दुर्गे (19) या तरुणाला सर्पदंश झाला. पुरामुळे तो अडकला होता. त्याला वेळीच उपचारासाठी दाखल करणे गरजेचे होते. मात्र पुरामध्ये अडकल्याने त्याला उपचारासाठी नेणे शक्य नव्हते. दरम्यान सरपंचाने याची माहिती बचाव पथकाला दिली. बचाव पथकाने तातडीने बोट पाठवून त्याला पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. सध्या शंकरला उपचारासाठी वणी येथे दाखल करण्यात आले आहे.

सर्पदंश झालेल्या तरुणाला बाहेर काढताना बचाव पथक

शेतीचे अतोनात नुकसान, खते, बियाणे गेले वाहून
पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतक-यांनी शेतामध्ये बि-बियाणे तसेच खते ठेवली होती. मात्र पुराच्या पाण्यामुळे बि-बियाणे व खते नष्ट झाली आहे. तर काही शेतक-यांचे शेतीपयोगी अवजारेही वाहून गेल्याची माहिती आहे. अनेक शेतक-यांचे जनावरे शेतात बांधून होते. ते वाहून गेल्याचे तसेच त्यांच्या जीव धोक्यात असल्याची माहिती काही शेतक-यांनी दिली.

वणी-घुग्गुस मार्ग बंद 
वणी-वरोरा मार्ग बंद असल्याने सध्या चंद्रपूर आणि नागपूरहून होणारी वाहतूक ही घुग्गुसमार्गे सुरू होती. मात्र पैनगंगा नदीमध्ये पाणीपातळीत वाढ होत आहे. या मार्गावर नायगाव जवळील सिमेंट रस्त्यावर पाणी भरले आहे. शिवाय रस्त्याचे प्रचंड नुकसान झाल्याने हा मार्ग देखील अखेर बंद करण्यात आला, अशी माहिती सा.बां. विभागाने दिली आहे. त्यामुळे सध्या वणीचा चंद्रपूर पासून संपर्क तुटला आहे. तर सध्या वणी-नागपूर ही वाहतूक करंजी-हिंगणघाट मार्गावरून होत असल्याची माहिती आहे.

स्वयंसेवकांची गरज
सध्या पुराने संपूर्ण परिसरात हाहाकार माजवला असल्याने लोकांना मदतीची नितांत गरज आहे. महसूल विभाग, पोलीस विभाग सध्या लोकांना रेस्क्यू करण्याचे कार्य करीत आहे. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वयंसेवकांची मदत देखील मागवण्यात येत आहे. ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचे असेल त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सावर्ला गावाच्या एक किलोमीटर अंतरावर पुराचे पाणी पोहोचले आहे.
उकणी गावात शिरलेले पाणी व उकण-अहेर मार्गावर साचलेले पाणी

 

Comments are closed.