घाटकोपर इमारत अपघात प्रकरण: 17 जणांचा मृत्यू, अाणखी लोक ढिगा-याखाली
शिवसेनेचा पदाधिकारी सुनिल शितप पोलिसांच्या ताब्यात
मुंबई: मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली. दामोदर पार्क इथे ही घटना घडली. या दुर्घटनेत आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. आणखी काही लोक ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारत दुर्घटनेला शिवसेनेचा पदाधिकारी सुनिल शितप हाच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तर या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
घाटकोपरमधील एलबीएस रोडवर श्रेयस सिनेमाजवळ साईदर्शन नावाची इमारत होती. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही इमारत जमीनदोस्त झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
या इमारतीच्या तळमजल्यावर एक नर्सिंग होम कार्यरत होतं. हे नर्सिंग होम शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितप यांचं आहे. इथे गेल्या काही दिवसांपासून इथं नूतनीकरणाचं काम सुरु होतं. मात्र ते काम करताना इमारतीच्या मुख्य गाभ्यालाच धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्याने इमारत कोसळल्याचं आरोप स्थानिकांनी केलाय.
या इमारतीला तडे गेले नव्हते. इमारतीखाली असलेल्या शितप नर्सिंग होम बंद करून तेथे ते हॉटेल काढणार होते. सोसायटीत आणि मनपा विश्वासात न घेता आणि दादागिरी करूण सुनिल शितप यांनी हे बाधकाम केले होते. बांधकाम करताना चार ही बाजुचे पिलर तोडल्यामुळे हि दुर्दैवी घटना घडली आहे, असं म.न.से विभागप्रमुख संजय भालेराव यांनी सांगितलं.
ही इमारत 30 वर्षे जुनी होती. इथे राहणाऱ्या १५ कुटुंबावर काळाने घाला घातला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २० ते ४० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल, मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर आहे. याशिवाय 8 अॅम्ब्युलन्स घटनस्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.
रहिवाशांनी विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले होते. त्यामुळे पीलर्सला धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी काहींनी विनापरवाना वैयक्तिक कार्यालयंही काढली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.
Offence registered, police is investigating. I have directed BMC commissioner to investigate and submit report within 15 days:Maharashtra CM pic.twitter.com/zm1QJeCxPT
— ANI (@ANI_news) July 25, 2017
इमारत अनधिकृत नव्हती: प्रकाश मेहता
साईदर्शन इमारत अनधिकृत नव्हती. चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असं आश्वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलं आहे. तसंच या विभागात अनेक इमारतींना ओसी नाही. महापालिकेने त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करावं, अशी सूचनाही त्यांनी केली.
इमारतीला नोटीस नाही: महापौर
दरम्यान मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घाटकोपरमधील घटनास्थळाला भेट दिली. यावेळी धोकादायक इमारतीला कुठलीही नोटीस दिली नसल्याचं महापौर महाडेश्वर म्हणाले. शिवाय दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 ते 40 जण अडकले आहेत. ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढलेल्या नागरिकांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.