मांगली येथून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी
देशी दारू दुकानदारांसह विक्रेत्याला सरपंचाची तंबी
सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव व घोन्सा येथे खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे. तर मांगली येथील दारू दुकानातून दररोज ४० ते ५० पेटी देशी दारू आलिशान वाहनातून मुकुटबन, गणेशपूर मार्गे चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर कोरपना, बल्लारशा तसेच अडेगाव कायर पुरड घोन्सा येथे पाठविली जात आहे. दारूची तस्करी रोखण्यासाठी पोलीस अपयशी ठरले असतानाच आता सरपंच नितीन गोरे यांनी दुकानदारासह विक्रेत्यांना तंबी दिली आहे.
दारूपुरवठा मांगली येथून घोन्सा येथे केला जातो. खडकी, गणेशपूर, वेळाबाई मार्ग कोरपना व गडचांदूर तसेच येडसीवरून खातेरा ते पार्डी मार्ग चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे. पोलीस मजुरी करून जगणाऱ्या गरीब जनतेचा १ पव्वा पकडून कारवाई करण्यातच धन्यता मानत आहे. मात्र, आलिशान वाहनातून सुरू असलेली दारू तस्करी दुर्लक्षित करीत आहे. मुकुटबन येथील दोन व्यक्ती दारूची तस्करी करीत आहे. याबाबत पोलिसांनाही माहिती असतानासुद्घा जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक चालविली जात असल्याचा आरोप होत आहे.
दारूची चंद्रपूर जिल्ह्यात तस्करी करणारे वाहन क्रमांक, तस्कराचे नाव व दारू सप्लाय करणाऱ्या चालकाचे नाव, मोबाइल नंबरसुद्धा बहुतांश पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याजवळ असल्याचे बोलले जात असल्याने कारवाई करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दारू दुकानदार नियम धाब्यावर बसवून अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती सरपंच नितीन गोरे यांना मिळताच त्यांनी दोघांनाही धारेवर धरत तंबी दिली आहे.
.