दिग्रस येथे भव्य कॅन्सर निदान व उपचार शिबिर
आंतराष्ट्रीय ख्यातीचे कॅन्सर तज्ज्ञ करणार रुग्णांची तपासणी
दिग्रस (प्रतिनिधी): दिग्रसमध्ये दिनांक 4 मे रोजी शनिवारी कँसर रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 11 ते 2 दरम्यान स्थानिक आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये घेण्यात येणार आहे. सर्वसामान्य लोकांना कँसरबाबत माहिती मिळावी व मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने अमेरिकन ऑन्कोलॉजी इंस्टिट्यूट नागपूर, दिग्रस डॉक्टर्स असोसिएशन व आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रसतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सुप्रसिद्ध कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉ. निखिल पांडे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.
कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. सुमारे दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज समोर आले आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये तसेच कोणत्याही अवयवामध्ये होऊ शकतो. कर्करोगाचे रोगनिदान लवकर होणे आवश्यक आहे. जर कॅन्सरचे योग्य वेळी निदान झाले तर योग्य त्या उपचाराने रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. दिवसेंदिवस कँसरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दिग्रसमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोणते लक्षण असल्यास अवश्य तपासणी करावी ?
स्तनात गाठी असणे, गुप्तांगांमध्ये घाव किंवा गाठी असणे, गिळताना त्रास होणे, आवाजात बदल होणे, तोंड उघडताना त्रास होणे, नाक, पोट इत्यादी भागांमध्ये गाठी तयार होणे, तोंडाचा व हिरड्यांचा जुना अल्सर असणे, दीर्घकाळ कफ असणे, गळ्याच्या मागे व टॉन्सिलमध्ये पांढरे डाग असणे, थुंकीतून रक्त जाणे, फुफ्फुसाचा त्रास असणे, गंभीर दस्त व मलाद्वारे रक्तस्राव होणे, थॉयराईडची समस्या असणे इद्यादी लक्षणे दिसत असल्यास कॅन्सर रोगनिदान तपासणी शिबिराला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिराविषयी माहिती देताना डॉ. श्याम जाधव (नाईक) म्हणाले की….
स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जवळपास सारखेच आढळले आहे. विदर्भात खर्रा गुटखा इत्यादींच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग तर महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहेत. शहरात प्रत्येकी २५ बायकांमध्ये एकीला तर खेड्यात ३० बायकांमध्ये एकीला स्तनांचा कर्करोग असण्याची शक्यता असते. कॅन्सरचे योग्य वेळी निदान झाले तर यावर मात करता येते. त्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळावा व रुग्णांचा जीव वाचावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी नाममात्र 50 रुपये तपासणी शुल्क ठेवण्यात आले आहे. या शिबिरात ज्या रुग्णांना कॅन्सरचे निदान होऊन शस्त्रक्रिया व पुढील उपचारांची गरज असेल त्यांना शासकीय योजनेद्वारा लाभही देण्यात येणार आहे. शिबिरासाठी नोंदणी करणे गरजेचे असून 9422922863 या क्रमांकावर इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे. ज्या व्यक्तींना कॅन्सरचे लक्षण असल्याची शंका असेल अशा व्यक्तींनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्यधाम हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत रोकडे, संचालक डॉ. श्याम जाधव (नाईक) डॉ. संदीप दुधे, डॉ. आशिष शेजपाल, डॉ. श्रीकृष्ण पाटील यांच्यासह दिग्रस डॉक्टर्स असोसिएशनच्या सदस्यांनी केले आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटलची चमू परिश्रम घेत आहे.